हरिश्चंद्र गडावर जाणा-या भाविकांवर मधमाशांचा हल्ला; शंभरहून अधिक भाविक जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2020 01:08 PM2020-02-22T13:08:58+5:302020-02-22T13:09:58+5:30
महाशिवरात्रीनिमित्ताने अकोले तालुक्यातील हरिश्चंद्र गडावर जाणा-या भाविकांवर मधमाश्यांनी हल्ला केल्याची घटना शुक्रवारी दुपारी घडली. यात १०० हून अधिक भाविक जखमी झाले. राजूर येथील ग्रामीण रुग्णालयासह इतर खासगी रुग्णालयात सायंकाळपर्यंत ३१ रुग्णांनी उपचार घेतले. यातील दोन जणांना पुढील उपचारासाठी अन्यत्र हलविण्यात आले.
राजूर : महाशिवरात्रीनिमित्ताने अकोले तालुक्यातील हरिश्चंद्र गडावर जाणा-या भाविकांवर मधमाश्यांनी हल्ला केल्याची घटना शुक्रवारी दुपारी घडली. यात १०० हून अधिक भाविक जखमी झाले. राजूर येथील ग्रामीण रुग्णालयासह इतर खासगी रुग्णालयात सायंकाळपर्यंत ३१ रुग्णांनी उपचार घेतले. यातील दोन जणांना पुढील उपचारासाठी अन्यत्र हलविण्यात आले. जखमी झालेल्या भाविकांमध्ये पुणे जिल्ह्यातील नारायणगाव, जुन्नर व परिसरातील संख्या अधिक होती. अकोले तालुक्यातील भाविकांची संख्या पंधराहून अधिक आहे.
महाशिवरात्रीनिमित्ताने हरिश्चंद्र गडावर पुणे, अहमदनगर, नाशिक आदी जिल्ह्यातून हजारो भाविक येत असतात. शुक्रवारी दुपारी काही भाविक हरिश्चंद्र गडावर चढ-उतार करीत होते. हरिश्चंद्रगडाचा पहिला टप्पा पार केल्यानंतर डोंगराच्या एका कड्याच्या कपारीत मध्यभागी असणाºया मधमाश्यांच्या पोळाला एका अज्ञात पर्यटकाने दगड मारला. दगड मारताच पोळावरील मधमाशा उठल्या. यावेळी या ठिकाणाहून जाणाºया अनेक भाविकांना या मधमाश्यांनी चावा घेतला. मधमाशा उठल्या असे समजताच भाविकांची एकच धावपळ उडाली.
वनविभागाचे कर्मचा-यांच्या ही बाब लक्षात येताच त्यांनी भाविकांना थांबवले. सुमारे दीड तास भाविकांना चढ, उतार करण्यास थांबविण्यात आले असल्याचे वनविभागाच्या सूत्रांनी सांगितले. दरम्यान मधमाश्यांच्या हल्ल्यात जखमी झालेल्या काही लोकांच्या अंगावरील या माश्या काढण्याचे काम गडावर कुटुंबासह जात असलेल्या आळेफाटाच्या प्रा.जयसिंग गाडेकर यांनी केले. यातील काही जखमींना त्यांनी स्वत:च्या व इतर वाहनातून राजूर येथील रुग्णालयात उपचारासाठी आणले. राजूर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल झालेल्या १७ जखमींवर डॉ.आर. पी. दिघे यांनी उपचार केले. तर येथील डॉ.बाबासाहेब गोडगे, डॉ.टी.के. लांडे यांच्या रुग्णालयात काही जखमींवर उपचार करण्यात आले. तर काही जखमींनी अकोले, कोतूळ, आळेफाटा आदी ठिकाणी उपचार घेतले असल्याची माहिती समजली आहे.