२० नोव्हेंबरपासून लगीनघाई; यंदा विवाहाचे ५४ मुहूर्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 15, 2019 01:48 PM2019-11-15T13:48:53+5:302019-11-15T13:49:34+5:30
२० नोव्हेंबरपासून यंदाची लग्नसराई सुरू होत असून हे विवाह मुहूर्त ३० जुलैपर्यंत आहेत. नोव्हेंबर ते जुलै या कालावधीत तब्बल ५४ विवाह मुहूर्त आहेत.
अहमदनगर : तुळशीचे विवाह पार पाडल्यानंतर आता लग्न मुहूर्त सुरू होणार आहेत. २० नोव्हेंबरपासून यंदाची लग्नसराई सुरू होत असून हे विवाह मुहूर्त ३० जुलैपर्यंत आहेत. नोव्हेंबर ते जुलै या कालावधीत तब्बल ५४ विवाह मुहूर्त आहेत. पंचांगाप्रमाणे मुहूर्त संख्येत कमी-अधिक तारखा देण्यात आल्या आहेत. तुळशीचे लग्नानंतर आता बाजारतही खरेदीसाठी लगीनघाई सुरू झाली आहे. तुळशीच्या विवाहानंतर लग्नसराई सुरू होत असल्याने ज्यांच्या घरात लग्न आहेत, ते दिवाळीच्या खरेदीसोबत लग्नासाठीही कपडे, सोने, वस्तुंची खरेदी करतात. दिवाळी आणि तुळशीचे विवाह पार पडले आहेत. त्यामुळे बाजारातही आता लग्नासाठीच्या खरेदीचा उत्साह वाढला आहे. नोव्हेंबरपेक्षा डिसेंबरमध्ये जास्त विवाह मुहूर्त आहेत, तर जानेवारीपेक्षा फेब्रुवारीत मुहुर्तांची संख्या अधिक आहे. मे आणि एप्रिल या दोन महिन्यातही मुहूर्त भरगच्च राहणार आहेत.
प्राचीन ग्रंथाचा आधार
आतापर्यंत गुरू-शुक्र अस्त असताना चातुर्मासात उपनयन-विवाह मुहूर्त दिले जात नव्हते. परंतु बदलत्या कालमानानुसार अडचणीच्या वेळी गुरू-शुक्र अस्त असताना व चातुर्मासात मुहूर्त द्यावेत, असा विचार पंचांगकर्त्यांच्या परिषदेमध्ये मांडण्यात आला होता. यासाठी प्राचीन ग्रंथाचा आधारही घेण्यात आला आहे. त्यामुळे पंचांगांमध्ये गुरू-शुक्र अस्त आणि चातुर्मासामध्ये (जुलै ते नोव्हेंबर २०२०) गौण मुहूर्त वेगळे दिलेले आहेत. हे मुहूर्त अडचणीच्या वेळी घेण्यास हरकत नाही, असे पंचांगकर्ते दा. कृ. सोमण यांनी सांगितले. (संदर्भ-लोकमत कालदर्शिका).
मुहूर्त समाधानकारक
तुळशीचा विवाह म्हणजे देव-दिवाळी. देवाचे लग्न झाल्यानंतर आपल्या घरातील विवाहोच्छुकांचे विवाह लावण्याची परंपरा आहे. तुळशीविवाह समाप्तीने देव-दिवाळी झाली. आता २० नोव्हेंबरपासून यंदाच्या लग्नसराईला प्रारंभ होत आहे. यंदा मुहुर्तांची संख्या समाधानकारक आहे. गुरु-शुक्र अस्त सध्या नसल्याने मुहूर्त समाधानकारक आहेत, असे अहमदनगर जिल्हा पुरोहित मंडळाचे अध्यक्ष किशोर जोशी यांनी सांगितले.
असा आहे मुहूर्त..
नोव्हेंबर- २०,२१, २३, २८, डिसेंबर-१, २, ३, ६, ८, ११, १२, १८, जानेवारी-१८, २०, २९, ३०, ३१, फेब्रुवारी- १, ४, १२, १३, १४, १६, २६,२७, मार्च- ३, ४, ८, ११, १२, १९, एप्रिल- १२, १६,२६,२७, मे-२,५,६,८,१२,१४,१७,१८,१९,२४, जून-११,१४,१५,२५,२९,३०, जुलै-२५,२९,३०.