सभापती मनोज कोतकरांसह नगरसेवकांचे उपोषण मागे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2020 04:28 AM2020-12-30T04:28:44+5:302020-12-30T04:28:44+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क अहमदनगर: महापालिकेतील विद्युत विभागप्रमुख म्हणून उपअभियंता वैभव जोशी यांना तत्काळ हजर होण्याचा आदेश आयुक्तांनी दिल्याने ...
लोकमत न्यूज नेटवर्क
अहमदनगर: महापालिकेतील विद्युत विभागप्रमुख म्हणून उपअभियंता वैभव जोशी यांना तत्काळ हजर होण्याचा आदेश आयुक्तांनी दिल्याने सभापती मनोज कोतकर यांनी मंगळवारी सायंकाळी उपोषण मागे घेतले. शहरातील बंद पडलेले विद्युत दिवे सुरू करण्याच्या कोतकर यांच्या मागणीवर तत्काळ कार्यवाही करण्याचे आश्वासन आयुक्त श्रीकांत मायकलवार यांनी दिले आहे.
शहरातील सर्व प्रभागातील बंद पडलेले विद्युत दिवे सुरू करावेत, यासह विद्युत विभागासाठी पूर्णवेळ अभियंत्यांची नियुक्ती करावी, या मागणीसाठी स्थायी समिती सभापती कोतकर यांनी मंगळवारी दुपारी मनपा आयुक्तांच्या दालनासमोर उपोषण सुरू केले होते. उपोषणात नगरसेवक असिफ सुल्तान, माजी नगरसेक निखिल वारे, बाळासाहेब पवार, अजय चितळे, संजय ढोणे, सतीश शिंदे आदींचा समावेश होता. यावेळी शहरातील विद्युत सुरू झालेच पाहिजेत, पूर्णवेळ अभियंत्यांची नियुक्ती न करणाऱ्या प्रशासनाचा धिक्कार असो, अशा घोषणा देत नगरसेवकांनी महापालिका कार्यालय दणाणून सोडले. उपायुक्त डॉ. प्रदीप पठारे यांनी सभापतींची भेट घेऊन उपोषण मागे घेण्याची विनंती केली; मात्र सभापती कोतकर हे उपोषणावर ठाम होते. आयुक्त श्रीकांत मायकलवार हे दालनात उपस्थित नव्हते. सभापती कोतकर दिवसभर आयुक्त दालनाच्या प्रवेशद्वारात फर्शीवर ठाण मांडून होते. नगरसेवकांसह पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या उपोषणाला पाठिंबा दिला. दरम्यान, सायंकाळी महापौर बाबासाहेब वाकळे यांच्यासह आयुक्त मायकलवार यांनी कोतकर यांची भेट घेऊन चर्चा केली. आयुक्तांच्या दालनात बैठक होऊन उपअभियंता जोशी यांना विद्युत विभागप्रमुख म्हणून तत्काळ हजर होण्याचा आदेश देण्यात आला. या बैठकीनंतर कोतकर यांनी उपोषण मागे घेतले.
विद्युत विभाग प्रमुख पद गेल्या दिवाळीपासून रिक्त आहे. त्यामुळे महापालिकेचा महत्त्वाकांक्षी स्मार्ट एलईडी प्रकल्प रखडला आहे. शहरातील अनेक दिवे बंद आहेत. त्यामुळे स्मार्ट एलईडी प्रकल्प सुरू करणे गरजेचे आहे. या प्रकल्पासाठी निविदाही प्राप्त झालेली आहे; परंतु विद्युत विभाग प्रमुख नसल्याने हा प्रस्ताव सादर झाला नाही. आयुक्त मायकलवार यांनी विद्युत विभाग प्रमुख म्हणून जोशी यांची नियुक्ती केली होती; मात्र हे हजर झाले नव्हते. कोतकर यांच्या उपोषणानंतर जोशी यांना हजर होण्याचा आदेश देण्यात आला असून, हा प्रकल्प मार्गी लागण्यास मदत होणार आहे.
.....
सूचना फोटो आहे.