बेलापुरात चार गावठी कट्टे हस्तगत, दोन आरोपी ताब्यात; मिळाली आठ काडतुसे
By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2023 02:49 PM2023-03-26T14:49:39+5:302023-03-26T14:50:04+5:30
विक्री करण्याच्या उद्देशाने चार गावठी कट्टे व आठ जिवंत काडतूसे अवैधारित्या बाळगणाऱ्या दोन आरोपींना तालुक्यातील बेलापूर येथून स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी ताब्यात घेतले.
श्रीरामपूर (जि. अहमदनगर) : विक्री करण्याच्या उद्देशाने चार गावठी कट्टे व आठ जिवंत काडतूसे अवैधारित्या बाळगणाऱ्या दोन आरोपींना तालुक्यातील बेलापूर येथून स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी ताब्यात घेतले.
आरोपींकडून एक लाख ४५,७०० रुपये किंमतीचे चार देशी बनावटीचे पिस्तूल, आठ जिवंत काडतुसे असा मुद्देमाल मिळाला. आरोपी दत्तात्रय सुरेश डहाळे (वय ३४ रा.श्रीरामनगर, शिर्डी, ता.राहाता ) व सुलतान फत्तेमोहमद शेख ( वय २९ रा.महोल्ला गल्ली बेलापूर, ता.श्रीरामपूर ) अशी आरोपींची नावे आहेत.
हवालदार मनोहर गोसावी यांनी श्रीरामपूर शहर पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला. कारवाईत स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस उपनिरीक्षक सोपान गोरे, हवालदार मनोहर गोसावी, दत्तात्रय गव्हाणे, सुरेश माळी, संदिप घोडके, विशाल दळवी, शंकर चौधरी, दिलीप शिंदे, संदिप चव्हाण, सागर ससाणे, रोहित येमुल, रणजित जाधव, उमांकात गावडे, अर्जून बडे सहभागी झाले होते. पोलिसांनी वेशांतर करून सापळा लावून आरोपींना बेड्या ठोकल्या.
पोलिस अधीक्षक राकेश ओला, अतिरिक्त पोलिस अधीक्षक स्वाती भोर, उपविभागीय पोलिस अधिकारी संदिप मिटके यांच्या सूचनेनुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकांनी कारवाई केली आहे.
आरोपी दत्तात्रय डहाळे हा सराईत गुन्हेगार आहे. औरंगाबाद जिल्ह्यात शस्त्र बाळगणे तसेच खुनाचा प्रयत्न एकूण असे दोन गंभीर गुन्हे त्याच्यावर दाखल आहे. तेथील गुन्ह्यात पोलिस त्याचा शोध घेत होते.