बेलापूरच्या मंडलाधिकारी लाचलुचपतच्या जाळ्यात
By शिवाजी पवार | Published: May 30, 2023 05:43 PM2023-05-30T17:43:36+5:302023-05-30T17:44:41+5:30
मध्यस्थालाही अटक : जमिनीच्या नोंदणीसाठी शेतकऱ्याकडून पैशांची मागणी
लोकमत न्यूज नेटवर्क, शिवाजी पवार, श्रीरामपूर (जि. अहमदनगर) : बेलापूर येथील मंडलाधिकारी सारिका भास्कर वांढेकर (वय ४१) यांनी जमिनीची नोंद करण्यासाठी मध्यस्थाच्या मदतीने दोन हजार रुपयांची लाच स्वीकारली. या प्रकरणी नगर येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने मंडलाधिकारी वांढेकर तसेच त्यांच्या मध्यस्थाला ताब्यात घेतले. त्यांच्यावर श्रीरामपूर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मध्यस्थाचे नाव बाबासाहेब बाबुराव कदम (वय ५२, राजुरी, ता.राहाता) असे आहे. लाचलुचपत विभागाचे पोलिस अधिक्षक शर्मिष्ठा घारगे, अतिरिक्त पोलिस अधिक्षक नारायण न्याहळदे, उपअधीक्षक प्रवीण लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक शरद गोर्डे यांनी ही कारवाई केली. कारवाईत दोन हजार रुपये मिळून आले.
श्रीरामपूर तालुक्यातील ऐनतपूर येथील एका तक्रारदाराने याप्रकरणी तक्रार केली होती. वारसा हक्काने मिळालेल्या जमिनीची फेरफारवर नोंदणी करावयाची होती. मात्र त्यासाठी त्यांच्याकडे पैशांची मागणी करण्यात आली होती. त्यानुसार मंगळवारी सकाळी बेलापूर येथील मंडलाधिकारी कार्यालयात लाचलुचपत विभागाने सापळा लावला होता. मध्यस्थ बाबासाहेब कदम याने तक्रारदाराकडून दोन हजार रुपयांची लाच स्वीकारताच त्याला रंगेहाथ पकडण्यात आले. पडताळणी दरम्यान मंडलाधिकारी वांढेकर यांनी कदम यांना लाचेसाठी प्रोत्साहन दिल्याचे निष्पन्न झाले.
मंडलाधिकारी वांढेकर या पाच महिन्यांपूर्वी बेलापूर येथे रुजू झाल्या होत्या. त्यांच्या कार्यपद्धतीवर यापूर्वी तक्रारी करण्यात आल्या होत्या. नागरिकांचा त्यांच्याविरूद्ध रोष होता. लाचलुचपतच्या कारवाईमध्ये पथकाचे रमेश चौधरी, संध्या म्हस्के, सचिन सुद्रुक, दशरथ लाड सहभागी झाले होते.