बेलापूर-पढेगाव रेल्वे चाचणी यशस्वी, दुहेरीकरण वेगाने; नगरचा रेल्वेप्रवास होणार सुपरफास्ट
By शिवाजी पवार | Published: July 23, 2023 07:46 PM2023-07-23T19:46:54+5:302023-07-23T19:48:19+5:30
लवकरच नगर ते मनमाडपर्यंतचे काम पूर्ण होणार असून यामुळे रेल्वे प्रवास अधिक वेगाने होणार आहे.
श्रीरामपूर (जि. अहमदनगर) : नगर-मनमाड रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणाच्या कामातील बेलापूर ते पढेगाव या १३ किलोमीटर अंतराची चाचणी शनिवारी घेण्यात आली. लवकरच नगर ते मनमाडपर्यंतचे काम पूर्ण होणार असून यामुळे रेल्वे प्रवास अधिक वेगाने होणार आहे.
गेल्या तीन वर्षांपासून नगर ते मनमाड दुहेरीकरणाचे काम सुरू आहे. या पूर्वी कोपरगाव ते येवला व येवला ते अंकाई, अंकाई ते अंकाई किल्ला, अंकाई किल्ला ते मनमाड, कोपरगाव ते कान्हेगाव, बेलापूर ते पुणतांबा या मार्गाची यशस्वी चाचणी घेण्यात आली होती. शनिवारी ही दुसरी यशस्वी चाचणी घेण्यात आली. एकूण ९४ किलोमीटर अंतराची चाचणी पूर्ण झाली आहे, अशी माहिती रेल्वेचे उपमुख्य अभियंता दीपक कुमार यांनी दिली.
एकेरी मार्गामुळे रेल्वेगाड्यांचा वेग कमी ठेवावा लागत होता. अनेकदा रेल्वेगाड्यांना थांबा दिला जात होता. तासनतास रेल्वे गाडी एकाच जागेवर थांबून राहत होती. मात्र आता हा पूर्ण मार्ग इलेक्ट्रिक इंजीनचा वापर करून दुहेरीकरण करण्यात येत आहे. त्यामुळे विनाकारण रेल्वेगाड्यांचा थांबा आता बंद होणार आहे. या कामामुळे रेल्वे ताशी १२५ प्रति किमी वेगाने धावणार आहे.
रेल्वे सुरक्षा आयुक्त मनोज अरोरा, मुख्य प्रशासकीय अधिकारी विवेक कुमार गुप्ता, मुख्य अभियंता दिनेश कटारिया, उपमुख्य अभियंता दीपक कुमार, कार्यकारी अभियंता डी. पी. पटेल, कार्यकारी अभियंता संदीप सिन्हा, सहाय्यक कार्यकारी अभियंता आर. जे. गायकवाड, अभियंता धर्मेंद्र कुमार, आर. डी. सिंग, सुद्धांशू कुमार, प्रगती पटेल आदी उपस्थित होते.