अफवा पसरवाल तर सावधान !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2018 05:39 PM2018-06-30T17:39:57+5:302018-06-30T17:40:15+5:30

लहान मुलांसह महिलांना पळविणारे व दरोडा टाकणाऱ्या टोळ्या गावोगावी फिरत असल्याच्या अफवांमुळे शहरासह ग्रामीण भागात भीतीचे वातावरण कायम आहे.

Beware if rumor spreads! | अफवा पसरवाल तर सावधान !

अफवा पसरवाल तर सावधान !

अहमदनगर : लहान मुलांसह महिलांना पळविणारे व दरोडा टाकणाऱ्या टोळ्या गावोगावी फिरत असल्याच्या अफवांमुळे शहरासह ग्रामीण भागात भीतीचे वातावरण कायम आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून अशा अफवा पसरविणारे व संशय घेऊन कुणाला मारहाण करणा-यांवर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा पोलीस प्रशासनाने दिला आहे.
जिल्ह्यात गेल्या महिनाभरापासून सुरू असलेल्या या चर्चांमध्ये काहीही तथ्य नसल्याचे समोर आले आहे. याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात पोलीस प्रशासन म्हणाले आहे, की गावामध्ये मुले पळविणा-या व दरोडा टाकणा-या टोळ्या आल्या आहेत, अशा स्वरूपाच्या अफवा सोशल मीडिया व इतर प्रकारे पसरवून जनतेमध्ये घबराट व भीतीचे वातावरण पसरविण्यात येत आहे. अशा स्वरूपाच्या अफवांमुळे गावात व वस्तीवर येणारे अपरिचित लोक, साधूवेशातील लोक, किरकोळ विक्री करणारे फेरीवाले यांना विनाकरण मारहाण होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. अशा स्वरूपाच्या मारहाणीतून कोणी व्यक्ती जखमी व अथवा मृत्युमुखी पडली तर सोशल मीडियावर इतर प्रकारे अफवा पसरविणा-या इसमांवर गुन्हे दाखल करण्यात येतील.
अशा स्वरूपाच्या अफवांमुळे औरंगाबाद येथे खुनाची घटना घडली असून, या प्रकरणी ५ ते ६ जणांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशा स्वरूपाच्या घटना नंदुरबार व मध्य प्रदेश येथेही घडल्या आहेत. नागरिकांनी अशा कोणत्याही स्वरूपाच्या अफवा पसरवू नयेत व कोणी अशा अफवा पसरवित असेल तर तत्काळ पोलिसांना माहिती द्यावी, असे आवाहन पोलीस प्रशासनाने केले आहे.

सोशल मीडियातूनच अफवेचा उगम
मुले पळविणारी टोळी आल्याची अफवा प्रथम दोन महिन्यांपूर्वी मध्य प्रदेश व नंदुरबार भागात प्रथम सोशल मीडियाच्या माध्यमातून आली. परराज्यातील संग्रहित व्हिडिओ प्रसारित करून त्याखाली दंतकथा सुरू झाल्या. ही अफवा औरंगाबाद, लातूर, बीड ते नगर जिल्ह्यांतही मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली. सोशल मीडियासह या अफवेची माऊथ पब्लिसिटीही मोठ्या प्रमाणात सुरू झाल्याने ग्रामीण भागातील ग्रामस्थ त्यावर सहज विश्वास ठेवत आहेत. जिल्हा पोलीस प्रशासनाने हा विषय गांभीर्याने घेत अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन केले आहे.

 

Web Title: Beware if rumor spreads!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.