खबरदार....कुणाला एप्रिल फूल केले तर...!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2020 01:36 PM2020-03-31T13:36:34+5:302020-03-31T13:37:26+5:30
१ एप्रिल रोजी अनेक जण मित्र, नातेवाईकांना काही तरी खोटे सांगून एप्रिल फूल करण्याचा प्रयत्न करतात. यंदा मात्र कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर लोकांमध्ये संभ्रम निर्माण होईल, असे मेसेज सोशल मीडियावर टाकू नयेत, अन्यथा गुन्हे दाखल करण्यात येतील, असा इशारा पोलिसांनी दिला आहे.
अहमदनगर : १ एप्रिल रोजी अनेक जण मित्र, नातेवाईकांना काही तरी खोटे सांगून एप्रिल फूल करण्याचा प्रयत्न करतात. यंदा मात्र कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर लोकांमध्ये संभ्रम निर्माण होईल, असे मेसेज सोशल मीडियावर टाकू नयेत, अन्यथा गुन्हे दाखल करण्यात येतील, असा इशारा पोलिसांनी दिला आहे.
या संदर्भात उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप मिटके यांनी मंगळवारी प्रसिद्धपत्रक काढले आहे. मित्र, नातेवाईकांची चेष्ठा अथवा केवळ एक आनंदाचा भाग म्हणून आपल्याकडे १ एप्रिलला काहीतरी गंभीर घडल्यासारखे मसेज पाठविणे, कुणाचा तरी खोटा निरोप देणे तसेच काहीतरी घडले आहे असे सांगण्याची पद्धत आहे. यातून कुणाचे नुकसान व्हावे, असा हेतू नसतो. परंतु यंदा मात्र परिस्थिती
वेगळी आहे. कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने सर्वत्र लॉकडाऊन केले असून, जमावबंदी व संचारबंदी आहे. अशा पस्थितीत मजाक म्हणून व्हायरल झालेल्या मेसेज अथवा व्हीडिओमुळेही लोकांमध्ये संभ्रम निर्माण होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. यातून प्रशासनावर ताण पडू शकतो. अशी शक्यता गृहित धरून पोलीस प्रशासनाने एप्रिल फूल करणा-यांवर कारवाईचा इशारा दिला आहे. एप्रिल फूल संदर्भात कुणी सोशल मीडियावर मेसेज व्हायरल केले तर संबंधित व्यक्ती व सदर व्हॉटअॅप ग्रुप अॅडमीनवर गुन्हे दाखल केले जातील, असा इशारा पोलिसांनी दिला आहे. ग्रुप अॅडमिनने आपल्या ग्रुपमधील सदस्यांना सूचना द्याव्यात तसेच सेटींगमध्ये जाऊन ग्रुप अॅडमिन मेसेज सेंड करील असे सेंटिग करावे, अशी सूचना देण्यात आली आहे.
सायबर पोलिसांचा वॉच
१ एप्रिलच्या दिवशी अथवा त्यानंतर अफवा पसरविणारे मेसेज, व्हीडिओ कुणी सोशल मीडियावरून व्हायरल करू नयेत. यासाठी सायबर पोलीस लक्ष्य ठेवून आहेत. ज्यांच्याकडून असे मेसेज, व्हीडिओ व्हायरल केले जातील त्यांचा शोध घेऊन तत्काळ गुन्हे दाखल केले जाणार असल्याचे सायबर पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक प्रतिक कोळी यांनी सांगितले.