भंडारदरा ७५ टक्के भरले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2018 02:37 PM2018-07-17T14:37:48+5:302018-07-17T14:38:12+5:30
भंडारदरा-मुळा धरण पाणलोटासह तालुक्यातील आज्यापर्वत, कुमशेत, हरिश्चंद्रगड, रतनगड, घाटघर व अकोले शहर परिसरात पाच दिवसांपासून संततधार पावसाचे रुद्रावतारी तांडव सुरू आहे.
अकोले(अहमदनगर) : भंडारदरा-मुळा धरण पाणलोटासह तालुक्यातील आज्यापर्वत, कुमशेत, हरिश्चंद्रगड, रतनगड, घाटघर व अकोले शहर परिसरात पाच दिवसांपासून संततधार पावसाचे रुद्रावतारी तांडव सुरू आहे. या धुवाँधार बरसातीमुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. सोमवारी दिवसभरात घाटघर तेथे २५८, तर रतनवाडी येथे २४३ मिलिमीटर पाऊस कोसळल्याची नोंद मंगळवारी सकाळी झाली. या पावसामुळे भंडारदरा धरण ७५ टक्के, तर निळवंडे धरण २५ टक्के भरले आहे.
सोमवारी दिवसभर तालुक्यात सर्वदूर आषाढसरींचा वर्षाव सुरू होता. भंडारदरा धरणात सोमवारी २४ तासांत तब्बल ८७६ दशलक्ष घनफूट नवीन पाण्याची आवक झाली आहे. तर या मोसमात धरणात नव्याने सात टीएमसी पाणी दाखल झाल्याने भंडारदरा धरणाचा पाणीसाठा आठ टीएमसीवर पोहोचला आहे. निळवंडेत दोन टीएमसी पाणी आले आहे. मंगळवारी सकाळी पावसाची झालेली नोंद व कंसात या मोसमात पडलेला पाऊस मिलिमीटरमध्ये-घाटघर २५८ (२४९२), रतनवाडी २४३ (२४५३), भंडारदरा १७८ (१५००), पांजरे १८९ (१७४५), वाकी १५५ (१३३४), निळवंडे ४५ (३४३), अकोले ३९ (३३८), आढळा १० (११५), कोतूळ ३१ (१८०). मुळा-भंडारदरा-निळवंडे धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढला आहे. भंडादरा धरणातून वीजनिर्मीती बोगद्याद्वारे ८४० क्युसेकने पाणी सोडण्यात आले आहे. भंडारदरा धरणाचा पाणीसाठा ७८३० दशलक्ष घनफूट, तर निळवंडेचा पाणीसाठा २०२५ दशलक्ष घनफूट इतका झाला आहे.