भंडारद-यात पाच महिन्यात ४४ हजार पर्यटकांची रेलचेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2019 05:16 PM2019-09-27T17:16:36+5:302019-09-27T17:18:27+5:30

पर्यटनाची पंढरी समजल्या जाणा-या अकोले तालुक्याच्या भंडारदरा परिसरात यावर्षी एप्रिल ते आॅगस्ट या पाच महिन्यांच्या कालावधीत सुमारे ४४ हजार पर्यटकांनी पर्यटनाचा आनंद लुटला.

In Bhandard, there will be a train of 5,000 tourists in five months | भंडारद-यात पाच महिन्यात ४४ हजार पर्यटकांची रेलचेल

भंडारद-यात पाच महिन्यात ४४ हजार पर्यटकांची रेलचेल

जागतिक पर्यटन दिन विशेष/ प्रकाश महाले/ वसंत सोनवणे/  राजूर/भंडारदरा : पर्यटनाची पंढरी समजल्या जाणा-या अकोले तालुक्याच्या भंडारदरा परिसरात यावर्षी एप्रिल ते आॅगस्ट या पाच महिन्यांच्या कालावधीत सुमारे ४४ हजार पर्यटकांनी पर्यटनाचा आनंद लुटला.
अकोले तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यात पर्यटनाची अनेक स्थळे आहेत. येथील इतिहासाची साक्ष देणारे  गड, किल्ले गिर्यारोहकांना आकर्षित करतात, तर पांडवकालीन हेमाडपंथी मंदिरे येथील पौराणिक आणि धार्मिकतेचे महत्त्व प्राप्त करून देत आहेत. भंडारदरा परिसरात पावसाळ्याच्या सुरूवातीस  काजवा उत्सव सुरू होतो. मुतखेल नाका ते शेंडी नाका असा पन्नास किलोमीटरच्या परिसरात रस्त्याच्या दुतर्फा असणा-या गर्द झाडांवर सुरू असणारा काजव्यांचा झगमगाट पर्यटकांना भुरळ घालतो. काजव्यांची सुरुवात होताच येथे पर्यटकांची गर्दी सुरू होत असते, ती फुलोस्तवापर्यंत सुरूच राहते.
यावर्षी परिसरात वरुण राजाचे उशिरा आगमन झाले. मात्र तो पडता झाल्यापासून अद्यापपर्यंत उघडण्याचे नावच घेत नाही. त्यामुळेच जूनच्या अखेरीस सुरू झालेला येथील जलोत्सव अद्यापही त्याच जोमाने सुरू आहे. दर  शनिवारी आणि रविवारी येथे पर्यटकांचा ओढा सुरूच आहे. या वर्षी १ एप्रिल ते ३१ आॅगस्टपर्यंत ४३ हजार ८४३ पर्यटकांनी  पर्यटनाचा आनंद लुटला. वन्यजीव विभागामार्फत अनेक ठिकाणी प्यागोडे, काही ठिकाणी पायवाट, निरीक्षणासाठी मनोरे, धोकादायक ठिकाणी लोखंडी रेलिंग उभारण्यात आल्या आहेत. मात्र निधीअभावी दुरूस्तीचे काम रखडले आहे.  शेंडी नाका ते घाटघरपर्यंत मुरशेतचा काही भाग वगळता रस्त्याचे काम झालेले असले तरी मुतखेल ते साम्रद दरम्यानच्या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. 
पर्यटकांना मूलभूत सुविधा उपलब्ध व्हाव्यात, तुटलेल्या रेलिंग, पायवाटा, पुलांची, शिड्यांची दुरुस्ती, न्हानी फॉलजवळ जाण्यासाठी पायवाट आदी बाबींचे प्रस्ताव तयार करण्यात आले आहेत. प्रस्ताव मंजूर झाले आहेत. यावर्षी गेल्या पाच महिन्यांत ४४ हजार पर्यटकांनी पर्यटनस्थळी भेट दिली. पर्यटकांना सुरक्षित व मनमुरादपणे आनंद घेता यावा यासाठी वन्यजीव विभाग प्रयत्नशील आहे. निधी उपलब्ध होताच दुरुस्तीचे व नव्याने सुचविलेले कामे सुरू होतील, असे कळसूबाई भंडारदरा अभयारण्य विभागाचे वनक्षेत्रपाल डी. डी. पडवळे यांनी सांगितले.
 

Web Title: In Bhandard, there will be a train of 5,000 tourists in five months

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.