शंभर वर्षांचे भंडारदरा धरण २५ वर्षांनंतर रिकामे
By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2019 05:14 AM2019-06-24T05:14:12+5:302019-06-24T05:16:06+5:30
शंभर वर्षांपूर्वी भंडारदरा धरणाच्या तळाशी बसविलेल्या दोन मोऱ्यांच्या झडपांची आतील बाजूने प्रत्यक्ष पाहणी करण्यात येणार आहे.
राजूर (जि. अहमदनगर) : शंभर वर्षांपूर्वी भंडारदरा धरणाच्या तळाशी बसविलेल्या दोन मोऱ्यांच्या झडपांची आतील बाजूने प्रत्यक्ष पाहणी करण्यात येणार आहे. त्यासाठी गुरुवारपासून धरणातून पाणी सोडण्यात आले. यामुळे पंचवीस वर्षांनंतर पुन्हा एकदा भंडारदरा रिकामे झाले आहे. आता देखभाल दुरुस्तीचा निर्णय होणार आहे. भंडारदरा धरणातून सोडलेले पाणी निळवंडे धरणात साठविण्यात आले आहे.
१९१० मध्ये भंडारदरा धरणाच्या कामास सुरुवात झाली होती. यावेळी पाणी सोडण्यासाठी बसविलेल्या मोऱ्यांच्या झडपा इंग्लंडहून बोटीने मुंबईपर्यंत आणण्यात आल्या होत्या. त्यानंतर व्हॉल्व तयार करण्यात आले. ते ११६ वर्षांपूर्वी तयार केले होते. ५० आणि १०० फुटांवर बसविलेल्या या झडपांची नेमकी काय स्थिती आहे? हे पाहण्यासाठी पंधरा वर्षापूर्वी पाणबुड्यांच्या सहाय्याने पाहणी करण्यात आली होती.
त्यावेळी या झडपांमध्ये बसविलेल्या रॉडची जाडी काहीशी कमी झाल्याचे अहवालात नमूद करण्यात आले होते. शेवटच्या म्हणजेच ५० फुटावरील मोरीच्या पातळीपर्यंत पाणी सोडण्यात आल्याने धरण पूर्ण रिकामे झाले आहे.
मृतसाठ्यातील पाणी सोडले
भंडारदरा धरणात सध्या उपयुक्त जलसाठा शून्य टक्के आहे. ३०० दशलक्ष घनफूट मृतसाठ्यातील २४ दशलक्ष घनफूट पाणी वॉल्व्ह दुरुस्तीसाठी नदीपात्रात सोडण्यात आले. ते पाणी निळवंडेत गेले. सध्या धरणात मृतसाठ्यातील २७६ दशलक्ष घनफूट पाणी शिल्लक आहे.