भंडारदरा ओव्हरफ्लो : निळवंडेत पाणी सोडण्यास सुरुवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 3, 2019 03:38 PM2019-08-03T15:38:08+5:302019-08-03T15:38:35+5:30
भंडारदरा धरण आज दुपारी दोन वाजता तांत्रिकदृष्ट्या भरल्याचे जलसंपदा विभागाने जाहीर केले. त्यामुळे धरणाचे वक्र दरवाजे उचलत धरणातून पाणी सोडण्यास सुरुवात झाली.
भंडारदरा/राजूर : भंडारदरा धरण आज दुपारी दोन वाजता तांत्रिकदृष्ट्या भरल्याचे जलसंपदा विभागाने जाहीर केले. त्यामुळे धरणाचे वक्र दरवाजे उचलत धरणातून पाणी सोडण्यास सुरुवात झाली.
धरणाात १० हजार ५०० दशलक्ष घनफुट इतका पाणीसाठा झाला आहे. जुलै महिन्यात धरण पाणलोटात दोन वेळा अतिवृष्टीचा तडाखा बसला तर काही दिवस पावसाची संततधार सुरू होती. मध्यंतरी पावसाचा जोर ओसरत गेला होता. मात्र २५ जुलैपासून पाणलोट क्षेत्रात पाऊस पुन्हा एकदा सक्रिय झाला. आज दुपारी दोन वाजता धरणातील पाणीसाठा १० हजार ५०० दशलक्ष घनफुटापर्यंत पोहचला. जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता किरण देशमुख यांनी धरण तांत्रिकदृष्ट्या भरल्याचे जाहीर केले. धरणातून सध्या वीजनिर्मितीद्वारे ८२५ क्यूसेक, स्पिलवेद्वारे ३ हजार६०० क्यूसेक असे एकूण ४ हजार ४२५ क्युसेकने धरणातून विसर्ग सोडण्यात सुरुवात झाली. भंडारदरा धरणातून सोडण्यात आलेला विसर्ग निळवंडे धरणात येणार असल्यामुळे लगेच प्रवरा नदीतील प्रवाह वाढणार नाही. निळवंडे धरणाचा पाणीसाठा आज दुपारी ४ हजार ५०० दलघफू आहे.
निळवंडे धरण भरल्यानंतर प्रवरा नदीत विसर्ग सोडण्यात येईल. प्रवरा नदीकाठच्या गावांना सध्या कुठल्याही प्रकारचा धोका नाही. धरणातील विसर्ग वाढवताना वेळोवेळी महसूल व पोलीस विभागांना कळविण्यात येणार असल्याचे कार्यकारी अभियंता देशमुख यांनी सांगितले.