भंडारदरा आज भरणार?
By Admin | Published: August 8, 2014 11:37 PM2014-08-08T23:37:45+5:302014-08-09T00:20:38+5:30
जिल्ह्याला नवसंजीवनी देणारे भंडारदरा जलमंदिर शनिवारी तांत्रिकदृष्ट्या भरणार आहे.
अकोले/राजूर : जिल्ह्यातील अन्य भाग अद्यापही पावसाच्या प्रतीक्षेत असताना अकोले तालुक्यात मात्र धुवॉधार सरी कोसळत आहेत. शेतीकामांना गती मिळण्यासाठी पावसाच्या उघडीची वाट पाहिली जात असून उत्तर नगर जिल्ह्याला नवसंजीवनी देणारे भंडारदरा जलमंदिर शनिवारी तांत्रिकदृष्ट्या भरणार आहे.
शुक्रवारी भंडारदरा धरणाने दहा टी.एम.सी.चा टप्पा ओलांडला. दहा हजार पाचशे द.ल.घ.फू पाणीसाठा झाल्यावर धरण तांञिकदृष्ट्या पूर्ण भरल्याची घोषणा जलसंपदाकडून केली जाते. पाणलोटातील पावसाचा जोर लक्षात घेता तशी घोषणा केली जाण्याची दाट शक्यता आहे. तालुक्यातील टिटवी, पाडोशी, सांगवी, बलठण, घाटघर, वाकी, आंबीत, कोथळे, येसरठाव, शिळवंडी आदी सर्व १३ लघूपाटबंधारे प्रकल्प ओसंडून वाहत असून निळवंडे व आढळा धरणाचे पोटात झपाट्याने पाणी वाढत आहे. तालुक्यात सर्वदूर पाणीच पाणी झाले असून पावसाने थोडी उघडीप द्यावी असे शेतकऱ्यांना वाटते.
दरम्यान भंडारदरा जलाशय, रंधा धबधबा, कोलटेंभे, रतनवाडी, साम्रद, घाटघर, पांजरे, उडदावणे, वाकी, निळवंडे परिसरात पर्यटकांची वर्दळ वाढली आहे. तरुणाई निसर्ग कवेत घेण्यासाठी धजावत आहे. चंदेरी प्रपातांच्या जलधारा अंगावर घेण्यासाठी बंबाळ्या रानात झुंबड उडताना दिसते. रंधा धबधबा व ‘स्पील वे’जवळ मोठी गर्दी होते. वाहतुकीची कोंडी ठरलेली असते. या भागात तरुणाईच्या उत्साहाला उधान येते.
या भागातील गर्दी लक्षात घेऊन सध्या राम भरोसे असलेल्या धरणाच्या सुरक्षा व्यवस्थेत सुधारणा होणे गरजेचे आहे. शिघ्र कृती दलाच्या धरतीवर आपतकालीन मदतीसाठी पोलिसांचे फिरते पथक येथे असावे अशी मागणी होत आहे. भंडारदरा धरणात ९ हजार ८०८, (९० टक्के), निळवंडेत ४ हजार ७३२ (७५ टक्के), तर आढळा ५६२ (५३टक्के) दशलक्ष घनफूट साठा झाला आहे. मुळा नदीपाञातून ५ हजार ६३८ क्युसेकने विसर्ग सुरु आहे.
(तालुका प्रतिनिधी)