भंडारदऱ्यात जलोत्सवानंतर आता निसर्गाचा पुष्पोत्सव
By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2018 05:29 PM2018-09-25T17:29:01+5:302018-09-25T18:39:20+5:30
‘सह्याद्री’च्या कुशीत वसलेल्या कळसूबाई-हरिश्चंद्रगड अभयारण्याच्या परिसरात पावसाळा संपताच निसर्गाचा पुष्पोत्सव सुरू झाला आहे.
अझहर शेख
नाशिक : ‘सह्याद्री’च्या कुशीत वसलेल्या कळसूबाई-हरिश्चंद्रगड अभयारण्याच्या परिसरात पावसाळा संपताच निसर्गाचा पुष्पोत्सव सुरू झाला आहे. वर्षा ऋतूत धरणीने पांघरलेल्या हिरव्या शालूवर विविध प्रजातींच्या रंगीबेरंगी रानफुलांच्या ताटव्यांचा जणू आगळावेगळा साज निसर्गाने चढविला असून हे सौंदर्य पर्यटकांच्या डोळ्यांचे पारणे फेडत आहे. निसर्गप्रेमींना भंडारदऱ्यातील हे अभयारण्य क्षेत्र पुन्हा एकदा खुणावू लागले आहे.
या अभयारण्य क्षेत्रात बहरलेल्या रानफुलांमध्ये टोपली भुई, खुरपापणी, कवळा, नीलकंठ, रानआले, रानहळद, जांभळी मंजिरी, सोनकी, कानपेट, मोठी सोनकी, लाल तेरडा, हिरवी निसुर्डी, जांभळी चिरायत, रान अबोली, पिवळी कोरांटी, ढाल तेरडा, कळलावी, धायटी, आभाळी-नभाळी, हळदी-कुंकू, अग्निशिखा, सोनसरील, घाणेरी, पांढरी कोरांटी अशी विविध रानफुले, मधमाशा व फुलपाखरांची जैवविविधता अभयारण्य क्षेत्रात पहावयास मिळते.