भंडारदरा ओव्हरफ्लो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2018 02:30 PM2018-08-12T14:30:18+5:302018-08-12T14:47:42+5:30

उत्तर नगर जिल्ह्याची भाग्यरेखा ठरलेल्या भंडारदरा धरण आज १०० टक्के भरले. आज दुपारी बारा वाजता १० हजार ५३३ दशलक्ष घनफुट झाल्यानंतर पाटबंधारे विभागाने भंडारदरा तांत्रिक दृष्ट्या भरल्याचे अधिकृत जाहीर केले.

Bhandardara overflow | भंडारदरा ओव्हरफ्लो

भंडारदरा ओव्हरफ्लो

राजूर : उत्तर नगर जिल्ह्याची भाग्यरेखा ठरलेल्या भंडारदरा धरण आज १०० टक्के भरले. आज दुपारी बारा वाजता १० हजार ५३३ दशलक्ष घनफुट झाल्यानंतर पाटबंधारे विभागाने भंडारदरा तांत्रिक दृष्ट्या भरल्याचे अधिकृत जाहीर केले.
यावर्षी भंडारदरा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस सुरू होण्यापूर्वी धरणातील पाणीसाठा ३ हजार १९९ दशलक्ष घनफुट इतका होता. पाणलोट क्षेत्रात जूनमध्ये पावसाचे आगमन झाले. दुस-या आठवड्यानंतर धरणात नवीन पाण्याची आवकही सुरू झाली. जुलैच्या दुस-या आठवड्यात या परिसराला मुसळधार पावसाने जोरदार तडाखा दिला. यानंतर पावसाचे प्रमाण वाढत राहिले. जुलैच्या दुस-या आठवड्यानंतर तर या परिसराला तीन वेळा अतिवृष्टीचा तडाखाही बसला होता. धरण ८६ टक्के भरल्यानंतर आणि पावसाचा वाढता जोर पाहून २१ जुलै रोजी सायंकाळपासून धरणाच्या स्पिलवे गेटमधून पाणी सोडण्यास सुरुवात झाली. मात्र चार दिवसानंतर पावसाचा जोर कमी होत गेला आणि पाणी सोडण्याचे प्रमाण कमी करण्यात आले. मागील आठवड्यापासून धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस पुन्हा सक्रिय झाल्याने धरणातील पाणी पातळी वाढत गेली. धरणातील पाणीसाठा १० हजार ५०० दशलक्ष घनफुट झाल्यानंतर धरण तांत्रिकदृष्ट्या भरल्याचे पाटबंधारे विभाग जाहीर करत असते. अखेर आज (रविवारी) दुपारी बारा वाजता ११ हजार ३९ दशलक्ष घनफुट क्षमता असणा-या या धरणातील पाणीसाठा १० हजार ५३३ दशलक्ष घनफुट झाला. धरण तांत्रिकदृष्ट्या भरल्याचे पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता किरण देशमुख यांनी जाहीर केले. उपविभागीय अभियंता रामनाथ आरोटे, सहाय्यक अभियंता कांबळे कर्मचारी परिस्थितीवर लक्ष ठेऊन आहेत.
या वर्षी १२ आॅगस्ट दुपारी बारापर्यंत १३ हजार ७९२ दशलक्ष घनफुट नवीन पाण्याची आवक झाली तर पूर्वीचे ३हजार १९९ दशलक्ष घनफुट पाणी शिल्लक होते. यातील या वर्षात आजपर्यंत आवर्तने, पाणी पातळी स्थिर ठेवण्याच्या दृष्टीने सोडण्यात आलेले पाणी असे एकूण ६ हजार ४५८ दशलक्ष घनफुट पाणी सोडण्यात आले. सोडण्यात येत असलेले पाणी निळवंडे धरणात साठविण्यात येत होते. निळवंडे धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचे उशीराने आगमन झाले, त्यातच सध्या निळवंडे धरणातून खरीपाचे आवर्तन सुरु आहे. त्यामुळे आता निळवंडे केव्हा भरणार याची प्रतीक्षा आहे.

Web Title: Bhandardara overflow

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.