भिंगारला वर्षानुवर्षे लष्करी कोट्यातूनच मिळते पाणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2019 01:12 PM2019-12-13T13:12:08+5:302019-12-13T13:12:50+5:30
भिंगार कॅन्टोन्मेंटला लष्करी क्षेत्राच्या कोट्यातून पाणी दिले जाते. पण पूर्वी रोज येणारे पाणी आता दिवसाआड येत आहे. तेही कमी दाबाने येते. यामुळे येथील पाणी टंचाईचा प्रश्न गंभीर बनत असल्याची नागरिकांची तक्रार आहे.
पाण्यासाठी फरपट / अनिकेत यादव ।
भिंगार (अहमदनगर) : नगरच्या भिंगार उपनगरातील नागरी वस्तीसह लष्करी आस्थापना व लष्करी निवासस्थानांना मुळा धरणातून पाणी पुरवठा होतो. अहमदनगर एमआयडीसीसाठीच्या पाणीपुरवठा पाइपलाइनद्वारे हा पुरवठा होतो. भिंगार कॅन्टोन्मेंटला लष्करी क्षेत्राच्या कोट्यातून पाणी दिले जाते. पण पूर्वी रोज येणारे पाणी आता दिवसाआड येत आहे. तेही कमी दाबाने येते. यामुळे येथील पाणी टंचाईचा प्रश्न गंभीर बनत असल्याची नागरिकांची तक्रार आहे.
भिंगार शहरात बºयाच वर्षांपासून पाण्याची समस्या कायम आहे. नागरिकांना नियमित पाणीपुरवठा होत नाही. या समस्येवर तोडगा काढण्यासाठी ठोस उपाययोजना अद्याप झालेल्या नाहीत. पाणी टंचाई दूर करण्याच्या मागणीसाठी नागरिक व राजकीय पक्षांनी या आधीही अनेक वेळा आंदोलने, मोर्चे काढले. तरीही पाण्याचा प्रश्न काही सुटत नाही. लष्करी विभागाचा मुळा डॅमसोबत ४० लाख गॅलन रोज असा करार आहे. परंतु मुळा डॅमकडून लष्करी विभागाला रोज २२ लाख गॅलन पाणी मिळते. यातून लष्कराचा भिंगार कॅन्टोन्मेंटशी रोज ३ लाख गॅलनचा करार आहे. परंतु कॅन्टोन्मेंटला रोज २ लाख गॅलनच पाणी मिळते. यातून २२ पैकी लष्करी विभागाला २० लाख गॅलनचा रोज पाणी पुरवठा होतो. त्यांनाही तो अपुरा पडत आहे. जेव्हा पूर्ण क्षमतेने मुळा डॅमकडून लष्करी विभागाला पाणी पुरवठा होईल. तेव्हाच कॅन्टोन्मेंटच्याही पाणी पुरवठ्यात वाढ होईल. परंतु तसे होत नाही. यातून कॅन्टोन्मेंट व लष्करी विभागाला व्यापारी दराने पाण्याचा दर लावला जात आहे. भिंगारकरांना या पाण्यासाठी मोठी पाणीपट्टी भरावी लागते. पाणीपट्टी व्यापारी पध्दतीने आकारली जात आहे. यामुळेही भिंगारकर त्रस्त आहेत. पाणीपट्टी भरुनही भिंगारकरांना दोन दिवसाआड पाणीपुरवठा केला जातो. तर भिंगारकरांची तहान कशी भागणार? असा सवाल आहे.
९६ लाखांची पाणीपट्टी; वसुली मात्र ३० लाखच
पाणीपट्टी पोटी कॅन्टोन्मेंटला वर्षाला ९६ लाख मीटरप्रमाणे बिल येते. तर कॅन्टोन्मेंट रहिवासी नागरिकांकडून ३० लाखांचाच खर्च वसूल होतो. ५६ लाख केंद्र सरकार भरते. तरीही कॅन्टोन्मेंट रहिवासी म्हणतात की, आम्हाला पाणीपट्टी खूप जास्त आहे. तरीही कॅन्टोन्मेंट रहिवाशांना आमचा जास्तीत जास्त पाणी पुरवठा करण्याचा प्रयत्न आहे, असे कॅन्टोन्मेंटचे पाणी पुरवठा विभाग अधिकारी महेंद्र सोनवणे यांनी सांगितले.