बाभळींनी वेढली भिंगार पोलीस कॉलनी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2019 04:28 PM2019-06-16T16:28:31+5:302019-06-16T16:28:35+5:30
पोलीस कर्मचाऱ्यांचे कुटुंबीय पोलीस कॉलनीत राहतात की, वेड्या बाभळीच्या काटवनात? असा प्रश्न भिंगारची पोलीस वसाहत पाहिल्यानंतर पडतो़
अरुण वाघमोडे
अहमदनगर : पोलीस कर्मचाऱ्यांचे कुटुंबीय पोलीस कॉलनीत राहतात की, वेड्या बाभळीच्या काटवनात? असा प्रश्न भिंगारची पोलीस वसाहत पाहिल्यानंतर पडतो़ नगर शहरातील पोलीस कॉलनीसारखीच भिंगार कॉलनीचीही दुरवस्था झालेली आहे़ कचऱ्यांचे ढिग, तुंबलेल्या गटारी, तुटलेले विजेचे दिवे आणि मोडकळीस आलेल्या खोल्या अशी दयनीय अवस्था या वसाहतीची आहे़
भिंगार येथील पोलीस कॉलनीत ६० घरे आहेत़ यातील २५ ते ३० घरे हे राहण्यासाठी योग्य नाही़ येथे २५ पोलीस कर्मचारी आणि त्यांचे कुटुंबीय राहतात़ या कुटुंबीयांना या घरांना घरपण देताना नाकीनऊ येत आहे़ या कॉलनीतील सर्वच रस्ते उखडलेले आहेत़ गेल्या अनेक दिवसांपासून रस्त्यांचे कामे झालेली नाहीत़ कॉलनीत असलेले विजेचे खांब नुसतेच उभा आहेत़ यावरील दिवे कधीच लागत नाहीत़ घरांच्यासमोरील आणि पाठीमागील गटारी तुंबलेल्या आहेत़ येथील कचरा उचलण्यासाठी कुणीच येत नाही़ कॅन्टोन्मेंट बोर्ड प्रशासनाच्या अंतर्गत ही वसाहत येत नाही़ त्यामुळे येथील रहिवाशांना त्यांच्याकडून काही सुविधा मिळत नाहीत़ या कॉलनीतील घरांची देखभाल दुरुस्तीची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभागाची आहे़ या विभागाकडून अनेक वर्षे येथील दुरूस्ती झाली नसल्याचे येथील रहिवाशांनी सांगितले़ पाणीपुरवठा करणाºया पाईपलाईनही तुटलेल्या आहेत़
वादळात उडाले होते पत्रे
आठ दिवसांपूर्वी झालेल्या वादळात पोलीस कॉलनीत असलेल्या एक बंगल्यावरील पत्रे उडून गेले होते़ येथील सर्व घरे मोडकळीस आलेली आहेत़ १९१८ मध्ये या खोल्या बांधलेल्या आहेत़ त्यामुळे वादळी पावसात या घरांना धोका आहे़ येथील रहिवाशांना जीव मुठीत घेऊन रहावे लागते़
वर्गणी करून करावी लागते दुरस्ती
कॉलनीतील पाण्याचे पाईप तुटले तसेच इतर काही अडचणी आल्या तर येथील रहिवाशांना वर्गणी करून तेथील दुरुस्ती करावी लागते़ या कॉलनीतील मोकळ्या जागेत नगर तालुका व भिंगार पोलिसांनी जप्त केलेले वाहने व अपघातातील वाहने ठेवलेली आहेत़ या कॉलनीला प्रवेशद्वार नसल्याने येथे सहज कुणीही प्रवेश करू शकते़