भानुदास मुरकुटे भारत राष्ट्र समितीच्या वाटेवर? घनश्याम शेलरांसह हैदराबादला
By शिवाजी पवार | Published: July 8, 2023 03:53 PM2023-07-08T15:53:17+5:302023-07-08T15:53:32+5:30
श्रीरामपुरात लोकसेवा विकास आघाडीच्या माध्यमातून मुरकुटे हे गेली काही वर्षे राजकारण करत आहेत.
श्रीरामपूर (जि. अहमदनगर) : येथील लोकसेवा विकास आघाडीचे प्रमुख व माजी आमदार भानुदास मुरकुटे हे तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांच्या भारत राष्ट्र समितीच्या वाटेवर आहेत. शुक्रवारी घनश्याम शेलार यांच्यासह त्यांनी हैद्राबाद गाठले होते. त्यामुळे त्यांच्या बीआरएस प्रवेशाच्या चर्चेला उधाण आले आहे. माजी आमदार मुरकुटे यांचे हैद्राबाद येथील मंत्रालयातील छायाचित्रे शुक्रवारी समाजमाध्यमांमध्ये झळकले. त्यांच्यासमवेत गंगापूरचे माजी आमदार अण्णासाहेब माने, अशोक कारखान्याचे संचालक ज्ञानेश्वर काळे हेदेखील आहेत.
श्रीरामपुरात लोकसेवा विकास आघाडीच्या माध्यमातून मुरकुटे हे गेली काही वर्षे राजकारण करत आहेत. मुरकुटे हे स्थापनेपासूनच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दाखल झाले होते. शरद पवार यांचे निष्ठावंत म्हणून त्यांची त्यावेळी ओळख होती. मात्र नंतरच्या काळात शिर्डी लोकसभा मतदारसंघातून त्यांनी शिवसेनेकडून दिवंगत बाळासाहेब विखे यांच्याविरूद्ध उमेदवारी केली होती. त्यात त्यांचा पराभव झाला होता.
स्थानिक राजकारणामध्ये कोणत्याही प्रमुख पक्षाविना लोकसेवा विकास आघाडीच्या माध्यमातून त्यांचे राजकारण सुरू होते. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांची मदत मिळू शकते असा कयास त्यांनी बांधला. आपली आघाडी म्हणजे रेल्वेचा डबा असून प्रसंगी तो कोणत्याही पक्षाला जोडता येतो, अशी टीप्पणीही त्यांनी अनेक वेळा सभांमधून केली आहे.
राज्याच्या राजकारणात सातत्याने राजकीय पक्षांच्या आघाडी बिघाडीचे खेळ सुरू आहेत. त्यामुळे कोणत्याही पक्षाचा झेंडा घेण्याऐवजी स्थानिक हिताला प्राधान्य देण्याकरिता आघाडी स्थापन केल्याचे मुरकुटे यांचे म्हणणे आहे. त्या माध्यमातून जिल्हा परिषद, पंचायत समिती व इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ते निवडणुका लढवतात. जिल्ह्याच्या राजकारणात महसूलमंत्री राधाकृष्ण विखे तसेच माजी मंत्री बाळासाहेब थोरात या दोघांशीही मुरकुटे हे चांगले संबंध ठेऊन आहेत. जिल्हा बँकेच्या निवडणुकीत तत्कालीन मंत्री थोरात व अजित पवार यांच्या पुढाकारामुळे करण ससाणेंसह ते बिनविरोध निवडून गेले होते.