‘लोकमत’चे सुरेश व्दादशीवार यांना भाऊसाहेब थोरात स्मृती पुरस्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 5, 2019 04:06 PM2019-01-05T16:06:52+5:302019-01-05T16:09:07+5:30
सहकार, साहित्य, समाजसेवा, पर्यावरण क्षेत्रात उल्लेखनीय कार्याबद्दल ‘लोकमत’चे संपादक, साहित्यिक सुरेश द्वादशीवार यांना स्वांतत्र्यसैनिक भाऊसाहेब थोरात स्मृती
संगमनेर : सहकार, साहित्य, समाजसेवा, पर्यावरण क्षेत्रात उल्लेखनीय कार्याबद्दल ‘लोकमत’चे संपादक, साहित्यिक सुरेश द्वादशीवार यांना स्वांतत्र्यसैनिक भाऊसाहेब थोरात स्मृती पुरस्काराने तर कृषी, शिक्षण, समाजसेवा, पर्यावरण क्षेत्रात उल्लेखनीय कार्याबद्दल नाशिक येथील सी. एम.डी. सह्याद्री फार्मसचे विलास शिंदे यांना डॉ.अण्णासाहेब शिंदे स्मृती पुरस्काराने व सहकारातील ज्येष्ठ नेते बाजीराव खेमनर व त्यांच्या पत्नी सुलोचना खेमनर यांना सहकारातील सामाजिक कार्यकर्ता पुरस्काराने गौरविण्यात येणार असल्याची घोषणा आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी शनिवारी येथे केली. एक लाख रूपये व सन्माचिन्ह असे या तिन्ही पुरस्कारांचे स्वरूप आहे.
स्वातंत्र्यसैनिक सहकारमहर्षी दिवंगत भाऊसाहेब थोरात व हरित क्रांतीचे प्रणेते दिवंगत डॉ. अण्णासाहेब शिंदे यांच्या जयंती महोत्सवानिमित्त संगमनेरात १० ते १२ जानेवारी दरम्यान प्रेरणादिन व पुरस्कार प्रदान सोहळ्याबरोबरच विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. अध्यक्षस्थानी आमदार बाळासाहेब थोरात हे राहणार असून सिक्कीमचे माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील, हरियाणा येथील रोहटक लोकसभा मतदार संघाचे खासदार दीपेंदरसिंग हुडा, हिंगोलीचे खासदार राजीव सातव आदींच्या प्रमुख उपस्थितीत या पुरस्कारांचे वितरण शुक्रवारी (११ जानेवारी) दुपारी साडेबारा वाजता संगमनेरातील मालपाणी लॉन्स येथे या पुरस्कारांचे वितरण होणार आहे. यापूर्वी ज्येष्ठ पत्रकार उत्तम कांबळे, मधुकर भावे, ज्येष्ठ लेखक भानू काळे, माजी आमदार दिवंगत सा. रे. पाटील आदींना या पुरस्कारने गौरविण्यात आल्याचे डॉ. तांबे यांनी सांगितले.
पुरस्कारार्थींची निवड विजयअण्णा बोराडे (मराठवाडा शेती सहाय्य मंडळ, औरंगाबाद), डॉ. राजीव शिंदे (प्रख्यात सर्जन, श्रीरामपूर), उल्हास लाटकर (अमेय प्रकाशन, पुणे), उत्कर्षा रूपवते (राष्टÑीय सचिव, युवक कॉँग्रेस), केशव जाधव (सेवानिवृत्त प्राचार्य, अमृतवाहिनी मॉडेल स्कू ल), प्रा. बाबा खरात (आदिवासी सेवक) यांच्या निवड समीतीने केली आहे. या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन आमदार डॉ. तांबे, जयंती महोत्सव कार्यक्रम संयोजन समिती व अमृत उद्योग समुहाच्या वतीने केले आहे.