‘भीमा’ नव्हे गटारगंगा !
By Admin | Published: May 21, 2014 11:49 PM2014-05-21T23:49:18+5:302014-05-22T00:02:28+5:30
किरण जगताप, कर्जत पुणे जिल्ह्यातील कारखानदारीतून बाहेर पडणारे प्रदूषित सांडपाणी भीमा नदी पात्रातच सोडले जात असल्याने नदीला गटारीचे स्वरुप आले आहे.
किरण जगताप, कर्जत पुणे जिल्ह्यातील कारखानदारीतून बाहेर पडणारे प्रदूषित सांडपाणी भीमा नदी पात्रातच सोडले जात असल्याने नदीला गटारीचे स्वरुप आले आहे. या प्रदूषित पाण्याचा परिणाम कर्जत तालुक्यातील नदीकाठच्या अनेक गावांवर होऊन नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. जलपर्णी कुजली राजगुरूनगर, दौंड आदी भागात वाढलेल्या अनेक कारखान्यातील प्रदूषित पाण्याचे उत्सर्जन भीमा नदी पात्रातच होते. तसेच या भागातील मोठ्या नागरी वस्त्या असलेल्या गावांचे सांडपाणीही थेट नदीपात्रातच सोडले जाते. वाढलेली जलपर्णी पाण्यातच कुजल्याने सर्वत्र दुर्गंधी पसरते. पर्यटक त्रस्त कर्जत तालुक्यातील सिद्धटेक, गणेशवाडी, खेड, दुधोडी आदी गावातील नागरिक या प्रदुषणाने हैराण झाले आहेत. जलपर्णी कुजल्याने पाणी काळपट बनले असून, पाण्यात लाल, काळ्या रंगाच्या अळ्या तयार झाल्या आहेत. राज्यभरातून सिद्धीविनायकाच्या दर्शनासाठी सिद्धटेक येथे येणारे पर्यटकही या दुर्गंधीने त्रस्त झाले आहेत. निसर्गाचे वरदान लाभलेली नदीकाठची गावे आता प्रदुषणाने व्यथित झाली असली शासन यंत्रणा प्रदुषणनियंत्रणाबाबत सुस्त असल्याचे दिसते. (वार्ताहर)