भूईकोट किल्ल्यात ‘मैं भी नेहरू’; तिनशे विद्यार्थ्यांनी केली वेशभूषा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 15, 2019 01:55 PM2019-11-15T13:55:43+5:302019-11-15T13:56:34+5:30
भूईकोट किल्ला येथे जी. एस. ढोरजकर फाउंडेशनच्या वतीने बाल दिनानिमित्त ‘मैं भी नेहरू’उपक्रम राबविण्यात आला.
भिंगार : भूईकोट किल्ला येथे जी. एस. ढोरजकर फाउंडेशनच्या वतीने बाल दिनानिमित्त ‘मैं भी नेहरू’उपक्रम राबविण्यात आला. यावेळी तीनशेहून अधिक विद्यार्थ्यांनी नेहरूंसारखी वेषभूषा केली होती. यावेळी ‘फ्रीडम रॅली’ काढण्यात आली होती.
पंडित नेहरू यांच्या जयंतीनिमित्त विविध उपक्रम राबविण्यात आले. ढोरजकर फाउंडेशनने भूईकोट किल्ला येथे यंदा ‘मैं भी नेहरू’ उपक्रम राबवून नेहरूंना अभिवादन करण्यात आले. गुरुवारी सकाळी आठ वाजता त्यांची पालकांसह किल्ल्याच्या मुख्य प्रवेशद्वारापासून ते नेता कक्षापर्यंत फ्रीडम रॅली काढण्यात आली. पंडित नेहरू यांना ‘चले जाव’ चळवळीत याच नेता कक्षात स्थानबद्ध करण्यात आले होते. तेथे त्यांनी वापरलेली खुर्ची व अन्य साहित्य आहे. तेथे अभिवादन केल्यावर या कक्षासमोर राष्ट्रगीत गायन करून राष्ट्रीय एकात्मतेची सामुदायिक शपथ घेण्यात आली. त्यानंतर स्वच्छता अभियान राबवून वृक्षारोपण केले. यावेळी इतिहास संशोधक प्रा. नवनाथ वाव्हळ यांनी विद्यार्थ्यांना स्वातंत्र्य लढा, किल्ल्याची माहिती दिली. यावेळी विद्यार्थ्यांना नेहरू टोपी, गुलाबाचे फुल, डिस्कव्हरी आॅफ इंडियाची प्रतिकृती देण्यात आली.
एल अॅण्ड टी कंपनीचे सरव्यवस्थापक अरविंद पारगावकर, इतिहास अभ्यासक डॉ. संतोष यादव, फाउंडेशनचे अध्यक्ष सीताराम ढोरजकर, संचालक आदर्श ढोरजकर, सुजाता नैलवाल, निवेदक अमोल बागुल, साई इंग्लिश मीडियम स्कूलच्या प्राचार्या आकांक्षा ढोरजकर आदी उपस्थित होते.