बालमटाकळीच्या भूमीपुत्राने उभारला सेंद्रिय गूळनिर्मिती प्रकल्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2021 04:18 AM2021-02-08T04:18:14+5:302021-02-08T04:18:14+5:30
बोधेगाव : शेवगाव तालुक्यातील बालमटाकळी येथील एका भूमीपुत्राने प्रतिदिन २०० टन उसाची गाळप क्षमता असणाऱ्या सेंद्रिय गूळनिर्मिती प्रकल्पाची उभारणी ...
बोधेगाव : शेवगाव तालुक्यातील बालमटाकळी येथील एका भूमीपुत्राने प्रतिदिन २०० टन उसाची गाळप क्षमता असणाऱ्या सेंद्रिय गूळनिर्मिती प्रकल्पाची उभारणी केली आहे. यासाठी लागणाऱ्या उसासाठी परिसरातील अल्पभूधारक ऊस उत्पादकांना प्राधान्य दिले जाणार असल्याने हा प्रकल्प सर्वसामान्य शेतकऱ्यांना लाभदायी ठरणार आहे.
बालमटाकळीचे भूमीपुत्र मयूर रंगनाथ वैद्य (वय ३६) यांनी गावातच शेवगाव-गेवराई मार्गालगत गट नंबर २०७ मध्ये जवळपास दोन एकर क्षेत्रामध्ये शिवरंग ॲग्रो नावाने सेंद्रिय गूळ निर्मितीचा प्रकल्प उभारला आहे. या प्रकल्पात ३ मीलमधून ऊस गाळप केल्यानंतर रस उकळून गूळ बनवण्यासाठी ५ स्वतंत्र अत्याधुनिक कढई आहेत. १८ ते २० मजूर याठिकाणी मशिनरी हाताळणी, पॅकिंग, सफाई आदी कामे सांभाळतात. रसायन विरहित गूळ निर्मितीसाठी केवळ भेंडी पावडर, चुना आदीचा वापर केला जातो.
यामुळे आरोग्यासाठी हितकारक असा नैसर्गिक गूळ याठिकाणी तयार होत असल्याचे दिसते. येथे गुळासोबतच गूळ पावडर, काकवी आदी तयार करण्यात येते. तसेच उसाची चोथरी, धूर, राख, मळी आदी टाकाऊ घटकांचा पुन्हा वापर केला जात आहे. या प्रकल्पाची प्रति दिन जवळपास २०० टन ऊस गाळप क्षमता असून याद्वारे दररोज २० ते २२ टन गूळ उत्पादनाचे उद्दिष्ट आहे.
सद्या ३ कढईतून गूळनिर्मिती सुरू असून तयार होणारा गूळ मुंबई, पुणे, जळगाव आदी जिल्ह्यात वितरित होत आहे. लवकरच पूर्ण क्षमतेने प्रकल्प सुरू झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात उसाची गरज भासणार आहे. साधारणपणे मासिक ३ हजार टन उसाद्वारे ३०० टन गुळाचे उत्पादन होऊन ७० ते ८० लाखांची उलाढाल अपेक्षित असल्याचे मयूर वैद्य यांनी सांगितले. या प्रकल्पासाठी त्यांना वडील रंगनाथ वैद्य, नितीन तुपे आदींचे सहकार्य लाभले.
----------
मोठ्या बागायतदार शेतकऱ्यांचा ऊस साखर कारखान्यांकडून सहज नेला जातो. परंतु, अल्पभूधारक ऊस उत्पादकांची अडचण होते. परिसरातील अशा सर्वसामान्य शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला जाईल. तसेच या प्रकल्पाद्वारे ग्रामीण भागातील तरुणांना रोजगाराची संधी उपलब्ध करू शकलो याचा अभिमान वाटतो.
-मयूर रंगनाथ वैद्य,
अध्यक्ष, शिवरंग उद्योग समूह
फोटो ओळी ०७ बालमटाकळी
बालमटाकळी येथे शिवरंग उद्योग समूहाचे अध्यक्ष मयूर रंगनाथ वैद्य यांनी उभारलेला सेंद्रिय गूळनिर्मिती प्रकल्प.