घारगाव परिसरात बिबट्याचा धुमाकूळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2019 11:44 AM2019-07-26T11:44:00+5:302019-07-26T11:46:40+5:30
घारगाव (ता.संगमनेर) परिसरातील खोबरेवाडी आणि कडाळेवस्ती येथे दोन बिबट्यांनी १ शेळी, १ बकरू व वीस कोंबड्या फस्त केल्याची घटना शुक्रवारी उघडकीस आली.
घारगाव : घारगाव (ता.संगमनेर) परिसरातील खोबरेवाडी आणि कडाळेवस्ती येथे दोन बिबट्यांनी १ शेळी, १ बकरू व वीस कोंबड्या फस्त केल्याची घटना शुक्रवारी उघडकीस आली. यामुळे परिसरात दहशत पसरली आहे. वनाधिका-यांनी घटनेचा पंचनामा केला आहे.
घारगाव परिसरात खोबरेवाडी येथे नवनाथ लक्ष्मण गाडेकर यांचे शेत आहे. गुरुवारी सायंकाळी पाच वाजलेच्या सुमारास बिबट्या शेतशिवारात शिरला. शेतात असलेल्या बकरावर बिबट्याने हल्ला करून बकरू ठार केले. त्याचदिवशी रात्री दीड वाजलेच्या सुमारास बिबट्या तुकाराम सदाशिव गाडेकर यांच्या वस्तीजवळ आला. तेथे गोठ्यात असलेल्या एका शेळीवर हल्ला करून शेळी ठार केली. मध्यरात्रीच्या सुमारास येथील कडाळे वस्तीत दोन बिबटे मच्छिंद्र शिवाजी केदार यांच्या कोंबड्यांच्या खुराड्यात घुसले आणि कोंबड्या फस्त केल्या. बिबट्याचे लहान व मोठे ठसे आढळल्याने दोन बिबटे असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.
मालकांनी वनपाल आर.के.थेटे यांना घटनेची माहिती दिली असता वनरक्षक एस.बी.धानापुणे, दिलीप बहिरट यांनी घटनास्थळ गाठून पाहणी केली. दरम्यान घटनास्थळावर तीन कोंबड्या मृत आढळून आल्या. लगतच्या शेतात कोंबड्यांचे पंख आणि पाय दिसून आले. दरम्यान सध्या शेतीचे दिवस सुरू आहेत. वनविभागाने बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.