कोतूळमधील मोठे देवबाबा मंदिर महिलांसाठी खुले
By Admin | Published: May 31, 2017 01:21 PM2017-05-31T13:21:48+5:302017-05-31T13:21:48+5:30
भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांनी महिला कार्यकर्त्यांसह मोठे देवबाबा मंदिरात प्रवेश करून दीडशे वर्षांपूवीची परंपरा मोडीत काढून महिलांना मंदिर प्रवेश खुला केला.
लोकमत न्यूज नेटवर्क
कोतूळ (अहमदनगर) : भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांनी महिला कार्यकर्त्यांसह मोठे देवबाबा मंदिरात प्रवेश करून दीडशे वर्षांपूवीची परंपरा मोडीत काढून महिलांना मंदिर प्रवेश खुला केला. सोमवारी तृप्ती देसाई व महिला कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत परिवर्तनाचे पाऊल टाकले. मंदिर व्यवस्थापन समितीनेही या निर्णयाचे स्वागत करत महिलांचा सन्मान केला. यावेळी अ?ॅड. मंगला हांडे, रेखा दिवटे, सविता निमसे, शाहनाज शेख, सिस्टर पठारे, रंजना झोळेकर, सविता भालेकर, प्रीतम हांडे, जिल्हा परिषद सदस्य रमेश देशमुख, के. बी. हांडे, सोमदास पवार, दिनकर पवार, राजेंद्र आरोटे, गौतम रोकडे, निरंजन देशमुख, तौसिफ पठाण, रवींद्र घाटकर यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
मोठे देव बाबा मंदिरात मंदिरात महिलांना प्रवेश बंदी असल्याचे वृत्त लोकमतने प्रसिद्ध केले होते. या वृत्ताची दखल घेत भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांनी मंदिरात प्रवेश करायचे निश्चित केले होते. या नियोजनानुसार सोमवारी सकाळी अकरा वाजता देसाई यांच्यासह महिला कार्यकर्त्यां कोतूळमध्ये दाखल झाल्या. स्री-पुरुष समानतेच्या घोषणा देत महिलांनी मंदीरात प्रवेश करुन मोठे देवबाबाचे दर्शन घेतले. याबाबत मंदिर व्यवस्थापन समितीने कोणतीही हरकत न घेता त्यांचे स्वागत केले. मंदिर व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सोमदास पवार यांनी देसाई यांनी सर्व महिलांचा सत्कार केला. व्यवस्थापन समितीने स्वत पुढाकार घेत महिला प्रवेश बंदीचा फलक काढून टाकला. देसाई यांनी गावक-यांच्या पुरोगामी विचाराचे स्वागत केले. मंदिर खुले केल्यानंतर देसाई यांनी कोतुळ ग्रामपंचायतला भेट दिली. सरपंच अनुसया धराडे, उपसरपंच सविता खरात यांनीही त्यांचा सत्कार केला. पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, उपनिरीक्षक नितीन बेंद्रे यांनी शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात केला होता.