बड्या नेत्यांच्या बड्या लढती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2021 04:15 AM2021-01-10T04:15:14+5:302021-01-10T04:15:14+5:30
केडगाव : नगर तालुक्यातील काही गावांतील बड्या नेत्यांच्या लढतीकडे आता संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे. दिग्गज निवडणुकीच्या रिंगणात उतरल्याने ...
केडगाव : नगर तालुक्यातील काही गावांतील बड्या नेत्यांच्या लढतीकडे आता संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे. दिग्गज निवडणुकीच्या रिंगणात उतरल्याने लढती चुरशीच्या होत असून कोण निवडून येणार, यासाठी गावोगावी लोकांच्या पैजा लागल्या आहेत. त्यामुळे याची उत्सुकता वाढली आहे.
नगर तालुक्यात चिचोंडी पाटील येथे भाजपचे तालुकाध्यक्ष मनोज कोकाटे रिंगणात उतरले असून त्यांच्या विरोधात माजी सदस्य संतोष कोकाटे लढत देत आहेत. माजी उपसरपंच शरद पवार आणि सचिन ठोंबरे यांच्यातील लढाई चिचोंडीमध्ये लक्षवेधी ठरली आहे. खारेकर्जुने येथे दिवंगत ज्येष्ठ नेते दादा पाटील शेळके यांचे नातू आणि जिल्हा बँकेचे संचालक रावसाहेब शेळके यांचे पुत्र अंकुश शेळके निवडणूक लढवत असून त्यांच्या विरोधात स्वामी वाघ रिंगणात उतरले आहेत. हिवरेबाजार येथे पद्मश्री पोपटराव पवार स्वत निवडणूक लढवत आहेत. त्यांच्या विरोधात किशोर संबळे यांनी आव्हान दिले आहे.
मांडवे गावात भाजपचे जेष्ठ नेते प्राचार्य सुनील पंडित यांच्या भावजई बबई पंडित निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या आहेत. सरपंच सुरेखा संजय निमसे याही निवडणूक लढवत आहेत. जेऊर येथील १० वर्षांपासून उपसरपंच असलेले बंडू पवार यांच्या विरोधात चार उमेदवार रिंगणात उतरले असल्याने जेऊरमध्ये ही लढत चर्चेची ठरली आहे. खंडाळा येथे जि.प. सदस्य व सेना नेते संदेश कार्ले यांचे बंधू प्रवीण कार्ले निवडणूक लढवत आहेत. त्यांच्या विरोधात त्यांचेच चुलत बंधू श्रीकांत कार्ले रिंगणात उतरले आहेत. कार्ले बंधूंच्या लढतीची सर्वांनाच उत्सुकता लागली आहे.
बहिरवाडी येथे एकच सर्वसाधारण जागा असून त्यावर सरपंच विलास काळे आणि भाजपचे तालुका उपाध्यक्ष राजेंद्र दारकुंडे यांच्यात घमासान लढाई होत आहे. ही लढाई परिसरात लक्षवेधी ठरली आहे. वाळूंज गावात नगर बाजार समितीचे संचालक संतोष म्हस्के यांच्या पत्नी अर्चना म्हस्के तसेच माजी पंचायत समिती सदस्य प्रमिला दरेकर आणि माजी सरपंच पार्वती हिंगे या तीनही महिला नेत्या एकाच आघाडीतून निवडणूक लढवत असल्याने त्यांच्या लढतीकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे. कामरगाव येथे सरपंच गणेश साठे आणि उपसरपंच अनिल आंधळे यांच्यात काट्याची टक्कर होत आहे. गणेश साठे हे बाजार समितीचे संचालक रावसाहेब साठे यांचे चिरंजीव आहेत.
डोंगरगण येथे सरपंच कैलास पठारे व मांजरसुंबा येथे सरपंच जालिंदर कदम स्वत: रिंगणात उतरले आहेत. जालिंदर कदम यांच्या विरोधात डॉ. राम कदम यांनी आव्हान दिले आहे.
....