मोठी बातमी; वाडिया पार्क येथील जलतरण तलावात बुडून माजी बीएसएफ अधिकाऱ्याचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: June 2, 2024 05:43 PM2024-06-02T17:43:39+5:302024-06-02T17:44:07+5:30
सागर कळसकर हे बीएसएफमधून निवृत्त झाले होते. त्यांनी राजस्थानमध्ये बाडमेर येथे बीएसएफमध्ये सेवा केली होती.
प्रशांत शिंदे
अहमदनगर- शहरातील वाडिया पार्क येथील जलतरण तलावात पोहताना एकाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना आज सकाळी घडली. सागर प्रकाश कळसकर (वय ४३, रा. तापीदास, गंजबाजार, अहमदनगर) असे मृत व्यक्तीचे नाव आहे.
सागर कळसकर हे वाडिया पार्क येथे पोहण्यासाठी आले होते. मात्र ते बराच वेळ पाण्यातून बाहेर न आल्याचे इतरांच्या लक्षात आले. त्यानंतर त्यांना पाण्यातून बाहेर काढून त्यांचे नातेवाईक राजेंद्र कळसकर यांनी जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले, परंतु उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. सागर कळसकर हे बीएसएफमधून निवृत्त झाले होते. त्यांनी राजस्थानमध्ये बाडमेर येथे बीएसएफमध्ये सेवा केली होती.
सागर कळसकर यांना पोहण्याचा छंद होता. ते निवृत्ती नंतर वाडिया पार्क येथे पोहण्यासाठी नेहमी येत होते परंतु आज सकाळी जलतरण तलावात पडून त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान सागर यांना पोहण्यासाठी तलावात उतरल्यानंतर चक्कर आली असावी किंवा पाण्यात बुडून मृत्यू झाला असावा, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. शवविच्छेदन अहवालानंतरच त्यांच्या मृत्यूचे कारण समोर येईल, असे पोलिसांनी सांगितले. पुढील तपास पोलीस तपास करत आहेत.
सामाजिक कार्यकर्ते मतीन सय्यद यांनी जिल्हा क्रीडा अधिकारी व ठेकेदार या घटनेला जबाबदार असल्याचा आरोप केला आहे. २४ मे रोजी जिल्हाधिकारी व जिल्हा क्रीडा अधिकारी यांच्याकडे जलतरण तलावात सर्टिफाइड लाईफ गार्ड ट्रेनर नसल्याची तक्रार केली होती. या तक्रारीची दखल घेतली असती तर आज ही दुर्घटना घडली नसती, असा मतीन सय्यद यांचा आरोप आहे.
या प्रकरणी जलतरण तलावाचा ठेकेदार व जिल्हा क्रीडा अधिकारी यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी त्यांनी मागणी केली आहे अन्यथा ५ जून पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसणार असल्याचा इशारा मतीन सय्यद यांनी दिला आहे.