महिला बचत गटांना दिवाळीत व्यवसायासाठी मोठी संधी !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2022 11:48 AM2022-10-13T11:48:07+5:302022-10-13T11:48:30+5:30
१५ व १६ हे दोनच दिवस बचत गटांना कृष्णाई मंगल कार्यालय, कोपरगाव येथे आपल्या तयार मालाची विक्री करता येणार आहे, असेही काळे यांनी सांगितले.
कोपरगाव : महिला बचत गटाच्या महिलांना देखील आर्थिक फायदा व्हावा, यासाठी प्रियदर्शनी महिला मंडळाच्या अध्यक्षा पुष्पाताई काळे यांच्या मार्गदर्शनाखाली बचत गटांसाठी कृष्णाई मंगल कार्यालयात स्टॉल्स उपलब्ध करून देणार आहे, अशी माहिती जिल्हा बँकेच्या संचालिका चैताली काळे यांनी दिली आहे.
काळे म्हणाल्या, मागील दोन वर्षे आलेल्या कोरोना वैश्विक आपत्तीमुळे बाजारपेठेतील चैतन्य गायब झाले होते. मात्र यावर्षी ही आपत्ती बहुतांश प्रमाणात कमी झाली आहे. काही दिवसांवर दिवाळी सण येऊन ठेपला आहे. दिवाळीपूर्वी बाजारपेठेत आकाशकंदील, पणती, रांगोळी, सुगंधी तेल, दिवाळीचा तयार फराळ, सुगंधी अगरबत्ती, मेणबत्ती, लक्ष्मीपूजन साहित्य या वस्तूंची मोठ्या प्रमाणात नागरिक खरेदी करीत असतात. या सर्व वस्तू बचत गटाच्या महिला तयार करीत असून, त्यांच्या मालाला शाश्वत ग्राहक उपलब्ध होऊन बचत गटांचे आर्थिक हित साधण्यासाठी प्रियदर्शनी महिला मंडळाच्या माध्यमातून व्होकल फॉर लोकल ही संकल्पना राबविण्यात येत आहे.
या संकल्पनेतून बचत गटाच्या महिलांनी तयार केलेले आकाशकंदील, पणती, रांगोळी, सुगंधी तेल, दिवाळीचा तयार फराळ, सुगंधी अगरबत्ती, मेणबत्ती आदी वस्तू ग्राहकांना एकाच ठिकाणी उपलब्ध होऊन खरेदीसाठी होणारी नागरिकांची पायपीट देखील होणार नाही. बचत गटाच्या महिलांनी तयार केलेल्या मालाची देखील मोठ्या प्रमाणात विक्री होऊन त्यांचा देखील आर्थिक फायदा साधला जाणार आहे. त्यामुळे बचत गटाच्या महिलांनी या संधीचा फायदा घेऊन तयार माल विक्रीसाठी आपले स्टॉल्स लवकरात लवकर आरक्षित करावेत. १५ व १६ हे दोनच दिवस बचत गटांना कृष्णाई मंगल कार्यालय, कोपरगाव येथे आपल्या तयार मालाची विक्री करता येणार आहे, असेही काळे यांनी सांगितले.