‘बिहार पॅटर्न’ने जगविली तीनशेहून अधिक झाडे!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2019 04:29 PM2019-06-09T16:29:07+5:302019-06-09T16:34:45+5:30
भर उन्हाळ्यात अकोले तालुक्यातील जामगाव येथील ‘बिहार पॅटर्न’ अंतर्गत करण्यात आलेल्या वृक्ष लागवडीतील तीनशेहून अधिक झाडे आजही हिरवीगार आहेत.
राजूर : भर उन्हाळ्यात अकोले तालुक्यातील जामगाव येथील ‘बिहार पॅटर्न’ अंतर्गत करण्यात आलेल्या वृक्ष लागवडीतील तीनशेहून अधिक झाडे आजही हिरवीगार आहेत. पाणी टंचाईची समस्या भेडसावत असतानाही ग्रामपंचायत आणि रोजगार सेवक यांच्या योग्य नियोजनामुळे हरितग्रामकडे वाटचाल करत असलेला जामगाव येथील उपक्रम इतर गावांना दिशादायक ठरेल असाच आहे.
दोन वर्षांपूर्वी अकोले पंचायत समितीच्या कृषी विभागामार्फत जामगाव येथे या उपक्रमांतर्गत गावातील रस्त्याच्या दुतर्फा करंज, शिसव, काशीद, बदाम, बॉटल पंप व काही शोभेची अशी विविध प्रकारची चारशे झाडे लावण्यात आली. या झाडांची देखभाल करण्यासाठी रोजगार हमी योजनेंतर्गत दोन व्यक्तींची नियुक्ती करण्यात आली आहे.
सुरवातीला या झाडांना शेणखत देण्यात आले, यानंतर नियमितपणे पाणी घालणे,झाडांच्या संरक्षनासाठी कूंपण तयार करणे, आळे तयार करून त्यातील तन काढणे आदी कामे या अंतर्गत येत असतात.
गावातील सुरवातीपासून ते शेवटच्या टोकापर्यंत व गावअंतर्गत रस्त्याच्या दुतर्फा काही झाडे लावण्यात आली आहेत. यातील काही झाडांची मर झालेली असली तरी चारशे पैकी तीनशे चाळीस झाडे आजही हिरवीगार आहेत.
शेवटच्या टोकाला लावण्यात आलेली झाडे मुरमाड जागेवर असल्याने त्यांची वाढ काहीशी कमी आहे. मात्र गावातील झाडांची वाढ चांगली झाली आहे. पावसाळ्यापूर्वी या झाडांना शेणखत टाकणे, आळे हलवून घेणे आदी करावयाचे कामांची माहिती रोजगार सेवक यांना दिली आहे.
त्यामुळे अखेरच्या टप्प्यातील वर्षात या झाडांची वाढ चांगली होईल, असा आशावाद पंचायत समितीच्या कृषी विभागाचे विस्तार अधिकारी डी. बी. कोकतरे यांनी सांगितले.