आॅनलाईन फसवणूक करणा-या बिहारी टोळीचा पर्दाफाश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2017 05:34 PM2017-09-20T17:34:02+5:302017-09-20T17:34:07+5:30

पतंजली स्टोअरची एजन्सी देण्याच्या नावाखाली नगरसह राज्यभर अनेकांची फसवणूक करणा-या बिहारी टोळीचा येथील सायबर पोलीस पथकाने पर्दाफाश केला असून, दोन दिवसांपूर्वी पाटणा येथून एका आरोपीस अटक केली आहे़ विकास कुमार असे आरोपीचे नाव आहे़ 

Bihari group expose online fraud | आॅनलाईन फसवणूक करणा-या बिहारी टोळीचा पर्दाफाश

आॅनलाईन फसवणूक करणा-या बिहारी टोळीचा पर्दाफाश

अहमदनगर : पतंजली स्टोअरची एजन्सी देण्याच्या नावाखाली नगरसह राज्यभर अनेकांची फसवणूक करणा-या बिहारी टोळीचा येथील सायबर पोलीस पथकाने पर्दाफाश केला असून, दोन दिवसांपूर्वी पाटणा येथून एका आरोपीस अटक केली आहे़ विकास कुमार असे आरोपीचे नाव आहे़ 
पोलिसांनी आरोपीकडून १२ मोबाईल, २४ सीमकार्ड, ४ पेनड्राईव्ह, एक लॅपटॉप, १० एटीएम कार्ड, विविध बँकेचे ६ पासबुक, २ ड्रायव्हिंग लायसन्स, ३ पॅनकार्ड, २ मतदान कार्ड, २ आधारकार्ड, १० बँकेचे चेकबुक, एक पासपोर्ट असा एकूण ९१ हजार ६३० रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे़ 
राहुरी येथील देविदास हौशीनाथ दहिफळे (वय ४१) यांना पतंजली उत्पादनाची एजन्सी घ्यायची असल्याने त्यांनी इंटरनेटवर पतंजलीची एक वेबसाईट ओपन केली़ त्या साईटवर असलेला फॉर्म भरून पाठविला़ त्या साईटवर राघवेंद्रसिंग याचा संपर्क क्रमांक दिला होता़ दहिफळे यांनी या क्रमांकावर संपर्क केला़ तेव्हा राघवेंद्रसिंग या व्यक्तीने पतंजलीच्या डिलरशीपसाठी पंजाब नॅशनल बँकेच्या अकौंटवर रजिस्ट्रेशन फी म्हणून आधी २५ हजार २०० व त्यानंतर ४ आॅगस्ट रोजी २ लाख ७५ हजार रूपये भरून घेतले़ त्यानंतर दहिफळे यांना पतंजली डिलरशीप दिल्याचे प्रमाणपत्र मेलवर पाठविण्यात आले़ त्यानंतर राघवेंद्रसिंग याने दहिफळे यांना पुन्हा १० लाख रूपये पाठविण्यास सांगितले़ यावेळी दहिफळे यांना संशय आल्याने त्यांनी पतंजली डिस्ट्रीब्युटरशीप व्हेरिफिकेशन अधिकारी यांच्याकडे माहिती घेतली असता त्यांनी ही वेबसाइट पतंजलीची नसल्याचे सांगितले़ याबाबत दहिफळे यांनी ३० आॅगस्ट रोजी राघवेंद्रसिंग नावाच्या व्यक्तीविरोधात सायबर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती़ 
या गुन्ह्याचा सायबर पोलीस ठाण्याचे निरीक्षक सुनील पवार, उपनिरीक्षक कीर्ती पाटील यांच्यासह पथकाने तपास केला तेव्हा फसवणूक करणारा आरोपी हा पाटणा येथील असल्याचे समोर आले़  पथकाने पाटणा येथे जाऊन विकास कुमार याला अटक केली़ आरोपीने त्याचे साथीदार संदीप कुमार, संतोष कुमार व अमित कुमार यांच्यासमवेत आॅनलाईन फसवणुकीचे रॅकेट चालवून देशभरातील अनेकांची फसवणूक केल्याची माहिती दिली़ पोलीस उर्वरित आरोपींच्या शोधात आहेत़ पवार, पाटील यांच्यासह उपनिरीक्षक प्रतीक कोळी, महादेव माळवदे, कॉन्स्टेबल राहुल गुंड, अरूण सांगळे, आकाश भैरट, प्रशांत राठोड आदींच्या पथकाने ही कारवाई केली़ 

Web Title: Bihari group expose online fraud

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.