स्वतंत्र अभियंता न नेमताच काढली कोट्यवधीची बिले; अहमदनगर बांधकाम विभागाचा कारभार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2020 03:49 AM2020-01-15T03:49:32+5:302020-01-15T03:49:37+5:30
अमरापूर-भिगवण रस्त्याचे १२३ कोटींचे काम
सुधीर लंके
अहमदनगर : रस्त्यांची गुणवत्ता तपासण्यासाठी ठेकेदार व बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांव्यतिरिक्त स्वतंत्र अभियंता (इंडिपेंडंट इंजिनिअर) नियुक्त केला जावा. त्या अभियंत्यांच्या अहवालानंतरच ठेकेदाराला देयके अदा करावीत असे बंधनकारक असताना अहमदनगर बांधकाम विभागाने कोट्यवधीची बिले केवळ कार्यकारी अभियंत्याच्या आदेशावरुन अदा केल्याचा प्रकार घडला आहे. स्वतंत्र अभियंता म्हणून कार्यकारी अभियंत्यांनीच स्वाक्षरी केलेली दिसत आहे.
अहमदनगर बांधकाम विभागांतर्गत हायब्रीड अॅन्युटी या प्रकल्पांतर्गत अमरापूर, पाथर्डी, कडा, कर्जत ते भिगवण या रस्त्याचे काम सुरु आहे. या टप्प्यातील ५९ किलोमीटरच्या रस्त्यासाठी १३० कोटी रुपयांची तरतूद आहे. या रस्त्याच्या कामासाठी नोव्हेंबर २०१७ रोजी निविदा प्रकाशित झाली. त्यानुसार ठेकेदाराला काम देण्यात आले. या कामासाठी प्रकाशित करण्यात आलेल्या निविदेत कामावर देखरेख ठेवण्यासाठी स्वतंत्र अभियंता नियुक्त करण्याची तरतूद आहे. त्यानुसार हा अभियंता नियुक्त केला जाणे आवश्यक होते. प्रत्यक्षात मात्र निविदेनंतर जवळपास दोन वर्षानंतर म्हणजे सप्टेंबर २०१९ मध्ये या अभियंत्याची नियुक्ती करण्यात आली. ही नियुक्ती करण्यापूर्वीच रस्त्याचे काम सुरु करुन ठेकेदाराला बिलेही अदा केली गेली. पहिल्या दोन टप्प्यात ठेकेदाराला हालचाल भत्ता (मोबिलायझेशन अॅडव्हान्स) म्हणून प्रत्येकी ६ कोटी ५१ लाख रुपये देण्यात आले. त्यानंतर काही ठराविक टक्के काम पूर्ण झाल्यानंतर ठेकेदाराला पहिला टप्पा म्हणून फेब्रुवारी २०१९ मध्ये १७ कोटी तर दुसºया टप्प्यात १८ कोटी रुपये अदा केले. काम किती पूर्ण झाले ते पाहून ही बिले अदा करणे अपेक्षित आहे.
कार्यकारी अभियंत्यानेच केली स्वाक्षरी
बिले अदा करताना स्वतंत्र अभियंता व कार्यकारी अभियंता या दोन्ही पदांच्या ठिकाणी एकाच व्यक्तीने स्वाक्षºया केल्याचे दिसत आहे. ही बाब नियमास अनुसरुन आहे का? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
नियमानुसारच बिले दिली : यासंदर्भात कार्यकारी अभियंता सुरेश राऊत यांच्याशी संपर्क साधला असता सर्व बिले ही स्वतंत्र अभियंता (इंडिपेंडंट इंजिनिअर) यांच्याच स्वाक्षरीने अदा झाली असल्याचा दावा त्यांनी केला. मात्र, ‘लोकमत’च्या हाती आलेल्या कागदपत्रांत स्वतंत्र अभियंता व कार्यकारी अभियंता या दोन्ही स्वाक्षºया एकाच व्यक्तीच्या दिसत आहेत. मागील सरकारच्या काळात ही बिले अदा करण्यात आली आहेत.