कस्टम ड्युटी, जीएसटीच्या नावाखाली नगरच्या उद्योजकाला कोट्यवधीचा गंडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2020 03:41 PM2020-05-16T15:41:44+5:302020-05-16T15:42:16+5:30
नवीन मुंबई येथील ईशकृपा शिपिंग अँड लॉजिस्टिक प्रा. लि (खारघर) या कंपनीचे संचालक व त्यांच्या साथीदारांनी आयात मालावरील कस्टम ड्युटी व जीएसटीच्या नावाखाली नगरच्या उद्योजकाला तब्बल ५ कोटी ८६ लाख ८३ हजार ८५० रुपयांचा गंडा घातल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
अहमदनगर : नवीन मुंबई येथील ईशकृपा शिपिंग अँड लॉजिस्टिक प्रा. लि (खारघर) या कंपनीचे संचालक व त्यांच्या साथीदारांनी आयात मालावरील कस्टम ड्युटी व जीएसटीच्या नावाखाली नगरच्या उद्योजकाला तब्बल ५ कोटी ८६ लाख ८३ हजार ८५० रुपयांचा गंडा घातल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
अहमदनगर एमआयडीसीतील जे.एम. इंडस्ट्रीज या कंपनीचे मालक निखिलेंद्र मोतीलाल लोढा यांनी शुक्रवारी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी ईशकृपा शिपिंग कंपनीचे संचालक नवनाथ नारायण गोळे, लतादेवी यशवंत कांबळे यांच्यासह संतोष कांबळे, निशा कुमकर व दत्ता नावाच्या व्यक्ती विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. लोढा यांनी त्यांच्या कंपनीसाठी लागणारा अॅल्युमिनियमचा कच्चा माल दुबई, मलेशिया व सिंगापूर येथून आयात केला होता. हा माल मुंबई येथील न्हावाशेवा बंदरावर आल्यानंतर तेथील कस्टम ड्युटी व जीएसटी आणि कामाचा मोबदला म्हणून सदर आरोपींनी लोढा यांच्याकडून ५ कोटी ८६ लाख ८३ हजार ८५० इतकी जास्त रक्कम घेतली. ही बाब लोढा यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक सुपनर हे पुढील तपास करीत आहेत.