करंजी परिसरातील रेवडी उत्पादकांचे कोट्यवधींचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2021 04:20 AM2021-04-04T04:20:32+5:302021-04-04T04:20:32+5:30
करंजी/तिसगाव : गतवर्षीप्रमाणे यंदाही कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मढीसह परिसरातील सर्वच यात्रा रद्द झाल्याने करंजी-तिसगाव (ता. पाथर्डी) परिसरातील रेवडी उत्पादकांचे कोट्यवधींचे ...
करंजी/तिसगाव : गतवर्षीप्रमाणे यंदाही कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मढीसह परिसरातील सर्वच यात्रा रद्द झाल्याने करंजी-तिसगाव (ता. पाथर्डी) परिसरातील रेवडी उत्पादकांचे कोट्यवधींचे नुकसान झाले.
गूळ आणि तिळापासून बनविल्या जाणाऱ्या रेवडी उत्पादकांना कोरोनाचा चांगलाच फटका बसला आहे. येथील रेवडीला राज्यभर मागणी असते. मढीसह इतर देवस्थानांमध्ये दर्शनासाठी येणारे भाविक रेवडी, गुडीशेव खरेदी करतात. त्यामुळे दोन ते तीन महिन्यांच्या काळात कोट्यवधींची उलाढाल होते. मागील वर्षी ऐन यात्रेच्या दिवसातच कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागल्याने सर्व यात्रा रद्द करण्यात आल्या. मढी, मायंबा, लोहसर, कोल्हार, करंजीसह इतर यात्रौत्सव रद्द झाले होते.
गतवर्षी रंगपंचमीनंतर मढी यात्रेचे तीन टप्पे झालेच नाहीत. त्यामुळे उत्पादित रेवडी, गोडीशेव विकलीच नाही. याचा हलवाई व्यावसायिकांना कोट्यवधींचा फटका बसला. तिसगाव शहरातील गनिभाई शेख व बाबूलालभाई शेख या पितापुत्राच्या मिलन रेवडी सेंटरवर दहा टन रेवडी, तर किमान चार टन गोडीशेवेचे उत्पादन होते. जानेवारी ते मार्च असे सलग तीन महिने सात आचारी काम करतात. यावर्षी मात्र हे आचारी शेतीकामांवर रोजंदारीने जात आहेत. तिसगाव-मढी रस्त्यावर अहमदभाई शेख यांचे समाधान रेवडी उत्पादन केंद्रावरील स्त्री - पुरुषांनी अर्थार्जनाचे दुसरे पर्याय शोधले आहेत. नसीरभाई शेख, चांदभाई शेख हातगाडी फिरवून फरसाण, भेळ विक्रीचे काम करतात. करंजी येथील रफिक शेख, पाथर्डी येथील बाळासाहेब भोसले, दिगंबर काकडे, बाळासाहेब देखणे, बहादूर चांदमिया, आदी रेवडी उत्पादन केंद्रांवरही कमी अधिक फरकाने हेच वास्तव आहे. गूळ हावरी अन् भाजलेल्या फुटाण्याच्या पिठाची बहुगुणी रेवडी उष्णता कमी करून मानवी आरोग्याला थंडावा देते. यंदा तर ही चवच चाखता आली नाही.
---
रेवडी साधारणत: दोन प्रकारात तयार केली जाते. रेवडीसाठीचा गूळ लातूरच्या बाजारातून खरेदी केला जातो. मागील वर्षी ४० ते ४५ टन रेवडीेचे उत्पादन केले होते. कोरोनाच्या संकटामुळे अचानक सर्व यात्रा रद्द झाल्याने रेवडी तशीच पडून राहिली. त्यामुळे १० ते १२ लाखांचे नुकसान झाले. यंदाही रेवडी व्यवसाय तोट्यातच आहे.
-रफीक शेख,
रेवडी उत्पादक, करंजी
--
०३ रेवडी, १