प्रदर्शन रद्द झाल्याने कोट्यवधीची उलाढाल ठप्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2021 04:52 AM2021-01-13T04:52:50+5:302021-01-13T04:52:50+5:30
दरम्यान, कोरोना सावटामुळे यंदा राजूर येथील डांगी जनावरांचे प्रदर्शन रद्द झाल्याने डांगी गोपालकांचा हिरमोड झाला आहे. या प्रदर्शनाच्या माध्यमातून ...
दरम्यान, कोरोना सावटामुळे यंदा राजूर येथील डांगी जनावरांचे प्रदर्शन रद्द झाल्याने डांगी गोपालकांचा हिरमोड झाला आहे. या प्रदर्शनाच्या माध्यमातून तालुक्यात कोट्यवधी रुपयांची उलाढाल होत असते.
अधिक दूध उत्पानदाच्या नादात संकरित जनावरे संगोपनाकडे शेतकऱ्यांचा कल आहे. यामुळे तालुक्यातील 'डांगी' जातीचे पशुधन कमी होऊ लागले आहे. दहा वर्षांपूर्वी तालुक्यात साधारण ३५ हजार डांगी जनावरे होती. आता त्यात घट होऊन ही संख्या २२ हजारांच्या घरात आली आहे. २०१९ ला डांगी जनावरांची पशुगणना ऑनलाईन झाली आहे. डांगी देशी जनावरे जास्त दूध देत नाहीत; पण हे दूध संकरित गाईंपेक्षा अधिक सकस असते. शेतीसाठी बैल मिळावेत म्हणून देशी गाई पाळल्या जायच्या. आता यांत्रिकीकरणामुळे शेती मशागतीसाठी बैलांचा वापर कमी झाल्याने देशी जनावरे संगोपन करणाऱ्यांची संख्या कमालीची घटली आहे. डांगीला प्रोत्साहन म्हणून तालुक्यातील राजूर, खिरविरे, कळस व इगतपुरी तालुक्यातील घोटी येथे जनावरांची प्रदर्शने भरवली जातात. गोपालकांचा बक्षिसे देऊन सन्मान केला जातो. यंदा अशी प्रदर्शने भरली नाहीत.
डांगी संवर्धनासाठी 'कृत्रिम रेत' प्रजननाला प्राधान्य दिले जाते. खडकी (पुणे), औरंगाबाद, बायफचे वरुळी कांचन येथील गोठीत रेत मात्रा प्रयोग शाळेतून डांगीचे रेत मागवले जाते. तालुक्यातील मेहेंदुरी, मोग्रस, कोंभाळणे, सावरगाव पाट, समशेरपूर, शेरणखेल, पिंपळगाव नाकविंदा, धामनगाव पाट, पांगरी, इंदोरी-रुंभोडी भागात वर्षभर हिरवा चारा असण्याच्या ठिकाणी डांगी गाई आठ ते दहा लिटर दूध देतात. आदिवासी भागात हिरव्या चाऱ्याअभावी दूध कमी मिळते म्हणून डांगीची संख्या घटत चालली आहे. तालुक्यात दररोज दीड- पावणेदोन लाख लिटर दूध उत्पादित होते. त्यात गावठी देशी व डांगी गाईचे दूध अगदी नगण्य आहे.
.....................२०१९ ला ऑनलाईन पशुधन गणना झाली, पण माहिती प्रसिद्ध झाली नाही. तालुक्यात अंदाजे २२ हजार डांगी व ४६ हजार गावठी पशुधन आहे. डांगी संवर्धनासाठी विशेष अनुदान दिले जाते. अनुवंश सुधार कार्यक्रमांतर्गत डांगी जातीचे कृत्रिम रेतन करण्यासाठी सरकारी सिध्द वळूकडून रेतन केल्यास व गर्भधारणा झालेल्या कालवडीच्या संगोपनासाठी ५ हजार रुपये अनुदान दिले जाते.
- डॉ. अशोक धिंदळे, तालुका पशुधन विकास अधिकारी .................
१२डांगी