चिचोंडी पाटीलमध्ये बर्ड फ्लू अहवाल पॉझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2021 04:19 AM2021-01-22T04:19:34+5:302021-01-22T04:19:34+5:30
अहमदनगर : नगर तालुक्यातील चिचोंडी पाटील येथे काही दिवसांपूर्वी मृत्यू झालेल्या कोंबड्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला असून, या कोंबड्या बर्ड ...
अहमदनगर : नगर तालुक्यातील चिचोंडी पाटील येथे काही दिवसांपूर्वी मृत्यू झालेल्या कोंबड्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला असून, या कोंबड्या बर्ड फ्लूमुळेच मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे खबरदारी म्हणून प्रशासन या भागातील एक किलोमीटर परिसरातील सुमारे २० हजार कोंबड्यांची विल्हेवाट लावणार आहे. याबाबतची तयारी सुरू असून जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतर त्यावर कार्यवाही होईल.
गेल्या दहा दिवसापूर्वी मिडसांगवी, निंबळक, चिचोंडी पाटील, आठवड येथे सुमारे १७५ कोंबड्या मृत आढळल्या होत्या. याशिवाय श्रीगोंदे, जामखेड तसेच नगर तालुक्यात काही वन्यपक्षी मृत सापडले होते. यातील श्रीगोंदा तालुक्यातील भानगाव येथील कावळ्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. परंतु आतापर्यंत कोंबड्यांमध्ये मात्र बर्ड फ्लू असल्याचे आढळले नव्हते. दरम्यान, चिचोंडी पाटीलमध्ये मृत झालेल्या कोंबड्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने प्रशासन अलर्ट झाले आहे. पशुसंवर्धन अधिकाऱ्यांसह जिल्हा प्रशासन चिचोंडी पाटील भागातील एक किलोमीटरचा परिसर ‘इन्फेक्टेड झोन’ म्हणून घोषित करणार आहे, तसेच या भागात असलेल्या सुमारे २० ते २२ हजार कोंबड्यांची विल्हेवाट लावण्याची तयारी सुरू आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतर या कोंबड्या मारण्याबाबत निर्णय होणार असून त्याची विल्हेवाट कशी लावायची किंवा या परिसरात बर्ड फ्लू आणखी पसरू नये यासाठी काय खबरदारी घ्यायची याबाबत सविस्तर मार्गदर्शन सूचना या आदेशात देण्यात येणार आहेत, अशी माहिती सूत्रांकडून समजली.