चालत्या बसमध्ये तीने दिला बाळाला जन्म : श्रीगोंदा तालुक्यातील घारगावमधील घटना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2019 11:59 PM2019-02-22T23:59:00+5:302019-02-23T09:36:59+5:30
आतापर्यंत आपण लोकलमध्ये चालत्या रेल्वेमध्ये प्रसुती झाल्याचे ऐकले होते. पूर्वी बैलगाडीतच प्रसुती व्हायची असेही अनेकादा ऐकले. पण एका महिलेने चालत्या बसमध्येच एका गोंडस मुलाला जन्म दिला.
सोमेश शिंदे
अहमदनगर : आतापर्यंत आपण लोकलमध्ये चालत्या रेल्वेमध्ये प्रसुती झाल्याचे ऐकले होते. पूर्वी बैलगाडीतच प्रसुती व्हायची असेही अनेकादा ऐकले. पण एका महिलेने चालत्या बसमध्येच एका गोंडस मुलाला जन्म दिला. शुक्रवार(२२ फेब्रुवारी) रोजी दुपारी साडेतीन ते चार वाजेच्या मढेवडगाव ते घारगावदरम्यान ही सुखद घटना घडली. रिना राकेश वास्कले यांनी गोंडस मुलाला जन्म दिला.
मुळचे मध्यप्रदेशातील असणारे रिना आणि तिचा पती राकेश बारामती येथे बांधकाम मजूरी करतात. सकाळी ते गावी जाण्यासाठी बारामती वरून अहमदनगरला जाण्यासाठी बारामती-औरंगाबाद या एस.टी बस(क्र.एम.एच. ०६, एस. ८३४२)मध्ये बसले. नगरवरून ते त्यांच्या गावी इंदौरला जाणार होते. परंतु नगरला जात असतानाच मढेवडगाव(ता.श्रीगोंदे) परिसरात आल्यावर दुपारी साडेतीन वाजेदरम्यान बसमध्ये रिना यांना अचानक कळा सुरू झाल्या. थोड्याच वेळात तिची चालत्या बसमध्ये प्रसुतही झाली. तो पर्यंत बस घारगांव येथे पोहोचली होती. ही बाब वाहक संदीप लगड यांच्या लक्षात येताच त्यांनी ही बाब चालक श्रावण धामणे यांना कळवली. धामणे यांच्यासाठी हा कसोटीचा क्षण होता. परंतु धामणे यांनी प्रसंगावधान दाखवत गाडी घारगांवमध्ये थांबवली. तात्काळ लगड गावातील डॉ. चंद्रशेखर कळमकर यांच्याकडे धावत गेले. डॉ.कळमकर हे धावतच रूग्णालयातून बसमधील रिनापर्यंत पोहोचले. डॉक्टरांनी लगेचच बाळाची नाळ कापली आणि बाकीचे सोपस्कार गाडीतच पार पाडले.
डॉ. कळमकर यांनी प्रसुती विनाशुल्क केली. बाळ आणि बाळंतीण सुखरूप असुन रिनाने एका गोंडस मुलाला जन्म दिल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. आणि बसमधील प्रवाशांनी सुटकेचा नि:श्वास टाकला. बाळ आणि बाळंतीणीसह बस अहमदनगरकडे मार्गस्थ झाली.
आपल्याला मुलगा झाला याचा आनंद तर आहेच. चालक,वाहक आणि डॉ.कळमकर यांच्याकडून मिळालेली तत्काळ आणि मोफत सेवा यामुळे आम्हाला आणखी आनंद होत आहे. -रीना आणि राकेश वास्कले