पारनेरमध्ये औटी यांच्यासमोर कडवे आव्हान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2019 05:12 PM2019-10-17T17:12:27+5:302019-10-17T17:12:56+5:30
पारनेर विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे उमेदवार विजय औटी व राष्ट्रवादीचे उमेदवार निलेश लंके यांच्यात दुरंगी लढत होत आहे़. नेहमी तिरंगी लढतीचा फायदा मिळवणा-या औटी यांच्यासमोर सेनेचेच जुने कार्यकर्ते असलेले लंके यांनी कडवे आव्हान उभे केले आहे. दुष्काळी मतदारसंघात पाणी आणण्यास प्राधान्य राहील हेच दोन्ही उमेदवारांच्या प्रचाराचे मुद्दे आहेत़.
पारनेर विधानसभा - विनोद गोळे ।
पारनेर विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे उमेदवार विजय औटी व राष्ट्रवादीचे उमेदवार निलेश लंके यांच्यात दुरंगी लढत होत आहे़. नेहमी तिरंगी लढतीचा फायदा मिळवणा-या औटी यांच्यासमोर सेनेचेच जुने कार्यकर्ते असलेले लंके यांनी कडवे आव्हान उभे केले आहे. दुष्काळी मतदारसंघात पाणी आणण्यास प्राधान्य राहील हेच दोन्ही उमेदवारांच्या प्रचाराचे मुद्दे आहेत़.
औटी हे चौथ्यांदा निवडणूक लढवत आहेत़. त्यांना विधानसभा उपाध्यक्षपदाची संधी मिळाल्याने राज्यातील प्रमुख लढतींमध्ये या लढतींचा समावेश होतो. औटी, लंके यांसह बहुजन आघाडीच्या वतीने साठे, वंचित आघाडीचे डी. आऱ शेंडगे, जनता पक्षाचे प्रसाद खामकर व अपक्ष भाऊसाहेब खेडेकर असे सहा जण रिंगणात आहेत़.
लंके हे पूर्वीचे सेनेचे कार्यकर्ते आहेत. त्यामुळे त्यांच्या मागे युवकांचे मोठे संघटन आहे. सेनेतही त्यांचे अनेक चाहते आहेत. गत तीन वर्षांपासून त्यांची विधानसभेची तयारी सुरू होती़. राष्ट्रवादीच्या प्रवेशावेळी कार्यकर्त्यांची जमविलेली गर्दी, शिवस्वराज यात्रेतील सभेची गर्दी व युवकांचे संघटन हेरून अजित पवार यांनी महिनाभर आधीच लंके यांना राष्ट्रवादीची उमेदवारी जाहीर करून टाकली होती.
लंके यांनी मतदारसंघात काढलेल्या जनसंवाद यात्रेला मोठा प्रतिसाद मिळाला. शरद पवार यांनी पारनेरपासूनच नगर जिल्ह्यातील प्रचाराचा नारळ फोडला.
आपण तालुक्यातील विकासाचे प्रश्न सोडविले, असे औटी सांगत आहेत. तर औटी हे जनतेशी संवाद साधत नाहीत, अपमानित करतात. असे मुद्दे लंके प्रचार सभांमधून मांडत आहेत.
लंकेंसाठी युवकांची एकजूट
निलेश लंके यांच्यासाठी बाजार समितीचे सभापती प्रशांत गायकवाड, महानगर बँकेचे अध्यक्ष उदय शेळके, उपसभापती दीपक पवार, मधुकर उचाळे, बाबाजी तरटे, बबलू रोहोकले, विक्रमसिंह कळमकर, अशोक सावंत, प्रभाकर कवाद यांच्याबरोबरच नगर तालुक्यातील दादा पाटील शेळके, प्रताप शेळके, जिल्हा परिषद सदस्य माधवराव लामखडे सक्रीय आहेत. माजी आमदार दादाभाऊ कळमकर हेही प्रचारात आहेत. माजी आमदार नंदकुमार झावरे यांचीही लंके यांनी भेट घेऊन त्यांचे मार्गदर्शन घेतले. राहुल झावरे हेही औटी यांच्यापासून दुरावले असल्याने ते लंके यांच्यासोबत राहण्याची शक्यता आहे. दादा शिंदे, विजय औटी, पारनेरचे नगरसेवक नंदकुमार औटी, जवळ्याचे संदीप सालके, टाकळी ढोकेश्वरचे बापू शिर्के, दत्ता निवडुंगे, कोहोकडीचे सुदाम पवार, अरूण पवार असे समर्थक लंके यांच्याकडे आहेत. गावागावात त्यांचे आकर्षण आहे.
औटी यांचा घोंगडी बैठकांवर भर
औटी यांनी उद्धव ठाकरे यांची सभा वगळता सगळीकडे घोंगडी बैठका घेत कार्यकर्त्यांची बांधणी व नियोजन केले आहे़. पंधरा वर्षात विकासाच्या माध्यमातून मतदरसंघाचा चेहरामोहरा बदलला हा त्यांच्या प्रचाराचा मुद्दा आहे. मागील निवडणुकीत बरोबर नसलेले जिल्हा परिषद सदस्य काशिनाथ दाते, बाबासाहेब तांबे, राहुल शिंदे, भाजपात आलेले सुजित झावरे, भाजपचे तालुकाध्यक्ष विश्वनाथ कोरडे, वसंत चेडे, आझाद ठुबे, रासपचे गंगाधर कोळेकर, आरपीआयचे अमित जाधव यांच्यासह सेनेचे रामदास भोसले, गणेश शेळके, दत्तात्रय कुलट, निलेश खोडदे आदींची एकजूट झाली आहे.