महापालिकेच्या सभेत घुसले भाजप कार्यकर्ते
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 4, 2018 10:26 AM2018-08-04T10:26:36+5:302018-08-04T10:27:22+5:30
गांधी मैदान येथील भाजप कार्यालयाला मालमत्ताकराच्या वसुलीसाठी महापालिकेने सील ठोकल्याने महापालिकेच्या सभेत भाजप सदस्य आक्रमक झाले.
अहमदनगर : गांधी मैदान येथील भाजप कार्यालयाला मालमत्ताकराच्या वसुलीसाठी महापालिकेने सील ठोकल्याने महापालिकेच्या सभेत भाजप सदस्य आक्रमक झाले. सभा सुरू होण्याच्या वेळी भाजपच्या कार्यकर्त्यांनी थेट सभागृहात धुसून महापौरांसमोरच घोषणाबाजी केली. यामुळे शिवसेनेचे सदस्य संतापले. महापालिकेची कारवाई बेकायदेशीर असल्याचा आरोप करीत भाजपच्या सदस्यांनी सील ठोकणाऱ्या कर्मचा-यांचे निलंबन करण्याची मागणी लावून धरली. मात्र कारवाई कायदेशीर व पूर्ण प्रक्रिया राबवून झाल्याचे प्रभाग अधिकारी तथा सहायक जिल्हाधिकारी प्राजित नायर यांनी स्पष्ट केल्यानंतर सभेतील गोंधळ शांत झाला. मात्र थकबाकीदार असलेल्या शिवसेनेच्या कार्यालयाला सील का ठोकले नाही, अशी विचारणा भाजप सदस्यांनी केल्याने सभेत गोंधळ झाला.
नगरमधील गांधी मैदानातील भाजपच्या जिल्हा कार्यालयाकडे २ लाख ४४ हजार एवढी मालमत्ताकराची थकबाकी आहे. सदरचे कार्यालय पंडित दिनदयाळ प्रतिष्ठानच्या नावावर आहे. २००५ पासून कार्यालयाकडे थकबाकी आहे. या थकबाकीच्या वसुलीसाठी २३ मे रोजी वसुलीची नोटीस देण्यात आली. नोटीस कोणी न घेतल्याने २६ मे रोजी सदरची नोटीस भाजप कार्यालयाला डकविण्यात आली होती. त्यानंतरही पैसे न भरल्याने उपायुक्तांच्या आदेशाने प्रभाग अधिकारी प्राजत नायर यांनी भाजप
कार्यालयाला गुरुवारी (दि.२) सील ठोकले. पंडित दिनदयाळ उपाध्याय प्रतिष्ठानचे वसंत लोढा यांनी संपूर्ण रकमेचे दोन धनादेश नायर यांना देताच एका तासाच्या आत सील काढण्यात आले. मात्र याबाबीची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा
रंगली.
पक्षाची बदनामी झाल्याने भाजपचे शहर उपाध्यक्ष तथा नगरसेवक किशोर डागवाले, नगरसेवक सुवेंद्र गांधी, सभापती बाबासाहेब वाकळे चांगलेच आक्रमक झाले. डागवाले यांनी सदरची कारवाई बेकायदेशीर झाल्याचा आरोप केला. प्रभाग अधिकारी नायर यांनी सदरची कारवाई योग्य आणि कायदेशीर असल्याचे स्पष्ट केले. मात्र ज्या दिवशी नोटीस डकवण्यात आली, त्यादिवशीचे फोटोग्राफ मोबाईलमधून डिलिट झाल्याची कबुली दिली. याचा अर्थ कारवाईची प्रक्रिया राबविली नव्हती, असा होत नसल्याचे ते म्हणाले.
यावेळी पुरावा देण्याची व पंचनामा कागदपत्रे दाखविण्याची मागणी डागवाले यांनी लावून धरली. शहर विभागात दोन लाखांच्यावर थकबाकी असलेल्या ८० मालमत्तांवर कारवाई सुरू आहे. त्यामध्ये भाजपचे कार्यालय होते. कारवाई एकट्या कार्यालयावर नव्हे, तर
त्या भागातील दोन मोबाईल टॉवर आणि लोढा हाईटस्मधील राठोड यांचेही दोन गाळे सील
केल्याचे नायर यांनी सभागृहाला सांगितले.
भाजपला बदनाम करण्याचे षड्यंत्र
सत्ताधारी शिवसेनेने भाजपला बदनाम करण्याचे षडयंत्र राबविले असल्याची टीका करीत भाजपचे कार्यकर्ते सभा सुरू होण्याच्या वेळी सभागृहात घुसले. माजी सभापती नरेंद्र कुलकर्णी, किशोर बोरा, उमेश साठे, हाजी अन्वर खान, हेमंत दंडवते आदी कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली. शिवसेना भाजपला बदनाम करीत आहे. प्रभागात वसुलीसाठी केवळ भाजपचेच कार्यालय होते का, शहरात भाजपचे शेकडो कार्यकर्ते असताना कोणालाही कारवाईची कल्पना दिली नाही, महापालिकेतील पदाधिका-यांनीच ही कारवाई करायला भाग पाडल्याचा आरोप कार्यकर्त्यांनी केला. याच प्रभागातील शिवसेनेच्या कार्यालयाकडे पाच लाख रुपयांची थकबाकी असताना कारवाई का नाही झाली, असा सवाल करीत त्यांनी महापौरांना निवेदन दिले. सभेत घुसण्याची प्रथा चुकीची असल्याचा आरोप दीप चव्हाण यांनी केला.
काँग्रेस अध्यक्षांनी लढविली भाजपची खिंड
भाजप कार्यालयावरील कारवाईबाबत किशोर डागवाले, सुवेंद्र गांधी, बाबासाहेब वाकळे यांनी प्रशासनाला धारेवर धरले. कारवाईचा अधिकार नायर यांना आहे का, यावरून काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष तथा नगरसेवक दीप चव्हाण यांनी प्रशासनाला धारेवर धरले.
नायर यांनी कायदेशीर प्रक्रिया पार पाडावी, मनमानी करू नये, थकबाकी वसुलीसाठी शासकीय कार्यालयावर थकबाकी आहे, त्यांच्यावर कारवाई का होत नाही? कारवाईत भेदभाव का करता?नायर यांना कारवाईचा अधिकार आहे का? त्यांना राज्य सरकार पगार देत असेल तर त्यांना महापालिकेत कारवाईचा अधिकार आहे का? असे प्रश्न विचारून चव्हाण यांनी प्रशासनाला लक्ष्य केले. चव्हाण यांच्या या प्रश्नांनी भाजप नगरसेवकांनाही गुदगुल्या झाल्या. प्रभारी आयुक्त तथा जिल्हाधिकारी यांनी एका आदेशान्वये नायर यांची प्रभाग अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे. त्यामुळे त्यांची कारवाई योग्य असल्याचे आस्थापना प्रमुख मेहेर लहारे यांनी स्पष्ट केले.
नायर हे प्रशिक्षणार्थी असल्याने त्यांनी कामकाज शिकावे, कारवाई करू नये, असे चव्हाण म्हणाले. महापालिका कायद्यातील ७२ (ब) या कलमान्वये कारवाईचे अधिकार नायर यांना आुयक्तांनी दिल्याचे लहारे यांनी सांगितले. अभय आगरकर असताना भाजप कार्यालयावर कारवाई कशी झाली, असा खोचक सवाल संपत बारस्कर यांनी केला, मात्र आगरकर यांनी मौनच बाळगणेच पसंत केले.
कारवाई बेकायदेशीर असल्याचा आरोप करीत डागवाले यांनी सील करणा-या कर्मचा-याच्या निलंबनाची मागणी केली. त्याला चव्हाण यांनी आक्षेप घेतला. यावेळी चव्हाण-डागवाले यांच्यात कलगीतुरा रंगला.