बेरोजगारीला भाजप, सेना जबाबदार-सत्याजित तांबे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2019 01:41 PM2019-10-14T13:41:16+5:302019-10-14T13:41:44+5:30
शेतीवर युवकांचे भविष्य घडणे शक्य नसून त्यांना शाश्वत रोजगार मिळाला पाहिजे. रोजगार निर्मिती करणे सरकारचे काम आहे. मात्र, गेल्या पाच वर्षात भाजप, सेना सरकारने रोजगार निर्मितीसाठी कोणतेही कार्य केले नाही. राज्यात अनेक उद्योग व्यवसाय बंद पडल्याने बेरोजगारी वाढली आहे, अशी टीका युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्याजित तांबे यांनी केली.
संगमनेर : शेतीवर युवकांचे भविष्य घडणे शक्य नसून त्यांना शाश्वत रोजगार मिळाला पाहिजे. रोजगार निर्मिती करणे सरकारचे काम आहे. मात्र, गेल्या पाच वर्षात भाजप, सेना सरकारने रोजगार निर्मितीसाठी कोणतेही कार्य केले नाही. राज्यात अनेक उद्योग व्यवसाय बंद पडल्याने बेरोजगारी वाढली आहे, अशी टीका युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्याजित तांबे यांनी केली.
संगमनेर तालुक्यातील जाखुरी, खराडी, मालुंजे येथे संगमनेर विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार आमदार बाळासाहेब थोरात यांच्या प्रचारार्थ सभांमध्ये ते बोलत होते. संगमनेर तालुका सहकारी दूध उत्पादक व प्रक्रिया संघाचे अध्यक्ष रणजितसिंह देशमुख, गणपतराव सांगळे, अजय फटांगरे, मिलिंद कानवडे, सोमेश्वर दिवटे, निखिल पापडेजा, सदाशिव वाकचौरे, आण्णा राहिंज, सुभाष सांगळे, आनंद वर्पे, रमेश नेहे, दादासाहेब देशमुख, भास्कर बागुल, नानासाहेब गुंजाळ, राजेंद्र देशमुख आदी उपस्थित होते.
तांबे म्हणाले, यंदाची विधानसभा निवडणुक युवकांसाठी खूप महत्त्वाची आहे. युवकांच्या आशा अपेक्षा पूर्ण करणारी ही निवडणूक आहे. काँग्रेस सरकारने मागील काळात अनेक उद्योग कारखाने या देशात आणले. परंतु भाजप, सेना सरकारने रोजगार निर्माण करेल असा एकही कारखाना राज्यात आणला नाही.
सहकारमहर्षी दिवंगत भाऊसाहेब थोरात यांनी तालुक्यात शिक्षणाची क्रांती केली. संस्था उभारल्यामुळे तालुक्याची स्थिती सक्षम झाली आहे. थोरात हे प्रदेशाध्यक्ष झाल्यामुळे राज्यात काँग्रेसची स्थिती खूप चांगली आहे.
सर्वांनी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे रहावे असे आवाहन त्यांनी केले. सचिन खेमनर, मोहन गुंजाळ, गौरव डोंगरे, सिद्धार्थ थोरात, रमेश गफले, शेखर सोसे, बाळासाहेब राहाणे, राधाकिसन देशमुख, किसन पानसरे आदी उपस्थित होते.