धनगर आरक्षणाबाबत भाजपाने फसवणूक केली, शरद पवारांची टीका
By अण्णा नवथर | Published: April 20, 2024 10:06 AM2024-04-20T10:06:30+5:302024-04-20T10:18:42+5:30
शरद पवार म्हणाले, राज्यात महाविकास आघाडीला अनुकूल वातावरण आहे.
अहमदनगर: पहिल्या कॅबिनेटमध्ये धनगर आरक्षणाचा निर्णय घेऊ, असे देवेंद्र फडणवीस यांनी बारामतीत येऊन सांगितलेले होते. त्यानंतर ते मुख्यमंत्री झाले. उपमुख्यमंत्री झाले. मात्र गेल्या दहा वर्षात धनगर आरक्षणाचा कोणताही निर्णय भाजपा सरकारने घेतला नाही, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचंद्र पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी नगर येथे शनिवारी केली.
शरद पवार म्हणाले, राज्यात महाविकास आघाडीला अनुकूल वातावरण आहे. भाजपाने जो काही ४०० पारचा नारा केलेला आहे. तो चुकीचा वाटतो. त्यांनी जर सर्वच्या सर्व जागा जिंकू, असे म्हटले असते तर मान्य ही केले असते. महाराष्ट्रात सिंचन घोटाळा झाला हे मोदींनी भाषणातून अनेक वेळा सांगितल परंतु हा घोटाळा कोणी केला. ते त्यांनी अजून स्पष्ट केलेले नाही. त्यांनी ते त्यांनी ते स्पष्ट करावे. आपल्या माहितीनुसार ते ज्यांच्याबाबत बोलत आहेत. त्यांनाच घेऊन मोदी महाराष्ट्रभर फिरत आहेत, अशी ही टीका पवार यांनी केली.
राज्यात भीषण दुष्काळी परिस्थिती निर्माण झालेली आहे. पाणी आणि चाऱ्याचा प्रश्न गंभीर बनलेला आहे. मात्र याबाबत सरकारने कुठलेही उपाययोजना केलेल्या दिसत नाहीत. अहमदनगर लोकसभेची निवडणूक ही पवार विरुद्ध विखे, अशी नाही कारण माझा इथून काही उमेदवारी अर्ज नाही. आमदार निलेश लंके हे आमच्याकडून निवडणूक लढवीत आहेत. त्यांच्या विरोधात कोण आहे आणि ते काय बोलतात, यावर भाष्य करणे मला योग्य वाटत नाही, असे शरद पवार म्हणाले.
याचबरोबर, शरद पवारांनी काय केले, अशी टीका गृहमंत्री अमित शाह यांनी केली होती. याबाबत विचारले असता पवार म्हणाले, आम्ही काय केले यापेक्षा 2014 ते 2024 या काळात त्यांनी नेमकं काय केलं आहे, हे त्यांनी जनतेला सांगावं, असेही पवार म्हणाले. पत्रकार परिषदेस आमदार निलेश लंके, शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे दक्षिण जिल्हा संपर्कप्रमुख शशिकांत गाडे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष जयंत वाघ, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके आदी उपस्थित होते.
तो उद्योजक मुंबईचा
महसूलमंत्र्यांचा आमदार निलेश लंके सोडून कोणताही उमेदवार द्या, असा निरोप घेऊन माझ्याकडे आलेला उद्योजक हा मुंबईलाच होता, अशी ही माहिती शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.