भाजपा, काँग्रेसची ऑफर पण रासप आजमावणार स्वबळ: महादेव जानकर
By अरुण वाघमोडे | Published: February 4, 2024 09:15 PM2024-02-04T21:15:57+5:302024-02-04T21:16:11+5:30
माझ्याकडे इतर पक्षातील अनेक जण तिकीट मागत आहेत.
अहमदनगर: राज्यात राष्ट्रीय समाज पक्षाची ताकद वाढत असून आम्ही ९० हजार ७०० पैकी ६२ हजार बूथ बांधली आहेत. पक्षाने बारामती, शिरूर, परभणी, माढा, नगर, नंदुरबारसह संपूर्ण महाराष्ट्रात लोकसभेची जोरदार तयारी केली आहे. आम्हाला बरोबर येण्यासाठी भाजपा, काँग्रेसची ऑफर आहे. यावेळी मात्र, रासप स्वबळ आजमविणार असल्याचे पक्षाचे संस्थापक अध्यक्ष महादेव जानकर यांनी सांगितले.
रासपच्या नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातील पदाधिकाऱ्याचा मेळावा रविवारी शहरातील लक्ष्मीनारायण मंगल कार्यालयात झाला. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी पक्षाचे प्रदेश सचिव रवींद्र कोठारी, डॉ.प्रल्हाद पाटील, खानदेश अध्यक्ष शरद बाचकर, जिल्हाध्यक्ष शहाजी कोडकर, महिला अध्यक्षा सुवर्णा जऱ्हाड, मंदाकिनी बडेकर, नाना जुंधारे आदींसह जिल्ह्यातील पदाधिकारी उपस्थित होते.
जानकर म्हणाले माझ्या पक्षाचे खासदार व आमदार होणार हे नक्की आहे. त्यामुळे माझ्याकडे इतर पक्षातील अनेक जण तिकीट मागत आहेत. नगरमध्ये पक्षाचे संघटन अजून मजबूत करण्यासाठी सर्व पदाधिकाऱ्यांनी काम करावे. नगर दक्षिण लोकसभा मतदार संघातून पक्षाचे प्रदेश सचिव रवींद्र कोठारी यांना उमेदवारी जाहीर केली आहे. आम्ही या आधी भाजपबरोबर युती केली होती. मात्र, त्यांनी आमच्या तोंडाला पाने पुसली. भाजप व काँग्रसने देशाची वाट लावली आहे. त्यामळे आगामी काळात जनतेला राष्ट्रीय समाज पक्ष म्हणून एक चांगला पर्याय निर्माण होत आहे. राज्यात ओबीसी, भटक्या विमुक्त जाती जमातींना कोणीही वाली नाही. त्यामुळे राज्यात या समाजाची अवस्था सैरभैर झाली आहे. म्हणून ओबीसींचा मुख्यमंत्री झाल्याशिवाय या समजांना न्याय मिळणार नाही. यासाठी सर्व ओबीसी, भटक्या समाजाने एकत्र यावे.