माझं पुनर्वसन करा; लोकसभेत पराभूत झालेल्या सुजय विखेंची पक्षाकडे साद

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2025 08:47 IST2025-03-24T08:47:14+5:302025-03-24T08:47:47+5:30

माजी खासदार सुजय विखे पाटील यांनी राजकीय पुनर्वसनाच्या मुद्द्याकडे पक्षातील नेत्यांचं लक्ष वेधलं आहे.

bjp ex mp Sujay Vikhe appeals to the party about his Political rehabilitation | माझं पुनर्वसन करा; लोकसभेत पराभूत झालेल्या सुजय विखेंची पक्षाकडे साद

माझं पुनर्वसन करा; लोकसभेत पराभूत झालेल्या सुजय विखेंची पक्षाकडे साद

BJP Sujay Vikhe : "जेव्हा मी आजी होतो, तेव्हा अनेकजण माजी होते. त्यावेळी तुम्हाला गप्पा मारायला चार-पाचजण होते. आता मी एकटाच माजी असल्याने कोणाकडे जायचे हा प्रश्न आहे. त्यामुळे या अधिवेशनातच आमदार कर्डिले माझ्या पुनर्वसनासाठी काहीतरी मोहीम हाती घेतील," असं म्हणत माजी खासदार सुजय विखे पाटील यांनी पुनर्वसनाच्या मुद्द्याकडे पक्षातील नेत्यांचं लक्ष वेधलं आहे.

नगर तालुका भाजपच्या वतीने रविवारी सकाळी पालकमंत्री, विधान परिषदेचे सभापती व महायुतीच्या नवनिर्वाचित आमदारांचा सत्कार सोहळा शहरातील सहकार सभागृहात आयोजित केला होता. यावेळी ते बोलत होते. सुजय विखे पुढे म्हणाले, "सध्या आमदार शिवाजी कर्डिले यांच्या म्हणण्याप्रमाणे होत आहे. त्यांनी राम शिंदे यांना विधान परिषेदत आमदार करण्याचा ठराव केला होता. ते आमदार झाले, नामदारही झाले. त्यामुळे माझ्यासाठी काय देणार आहात, याचा खुलासा करून टाकावा. यानंतर जिल्ह्याची धुरा व्यवस्थितपणे पुढे घेऊन जाऊ." 

दरम्यान, यानंतर आमदार मोनिका राजळे, संग्राम जगताप, काशीनाथ दाते, अमोल खताळ, विक्रम पाचपुते, विठ्ठल लंघे यांनीही आपल्या भाषणात सुजय विखे-पाटील यांच्या पुनर्वसनाचा मुद्दा उचलून आमदार कर्डिले यांना पुढाकार घेण्याची विनंती केली.

पुनर्वसनावर कर्डिले म्हणाले, "तुम्ही काळजी करू नका. सभापती राम शिंदे यांच्या नेतृत्वाखाली तुम्हाला राज्यसभेवर पाठवू." सभापती राम शिंदे यांनी सुजय विखेंना सबुरीचा सल्ला देत म्हटलं की, "शिवाजीराव कर्डिलेंनी माझा ठराव केला आणि मी आमदार झालो. आता सुजय विखे यांना त्यांनी राज्यसभेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. मी श्रद्धा आणि सबुरी पाळली, तुम्हीही पाळा. विधानसभेला अल्पशा मतांनी पराभव झाल्यानंतर देवाभाऊंच्या पुण्याईने सभापती झालो. तसं आपल्याला काहीतरी करावं लागेल."
 

Web Title: bjp ex mp Sujay Vikhe appeals to the party about his Political rehabilitation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.