शिक्षण क्षेत्रात भाजप सरकारचा अनागोंदी कारभार - बाळासाहेब थोरात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2018 04:08 PM2018-06-23T16:08:41+5:302018-06-23T16:09:07+5:30
भाजप सरकार व प्रशासन यांच्यात सुसंवाद नसून नागरिकांबरोबरच शेतकरी व शिक्षकांमध्ये मोठे असंतोषाचे वातावरण आहे.
संगमनेर : भाजप सरकार व प्रशासन यांच्यात सुसंवाद नसून नागरिकांबरोबरच शेतकरी व शिक्षकांमध्ये मोठे असंतोषाचे वातावरण आहे. शिक्षण क्षेत्रातील भाजपा सरकारचा अनागोंदी कारभार थांबविण्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, टीडीएफ व मित्र पक्षांचे उमेदवार संदीप बेडसे हे शिक्षकांच्या हक्कासाठी लढणारे योग्य व्यक्तीमत्व असून आपण सर्वजण त्यांच्या पाठीशी आहोत. असे प्रतिपादन माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांनी केले आहे.
शुक्रवारी जिल्हा सहकारी बँकेच्या संगमनेर शाखेच्या सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकार सभागृहात झालेल्या काँग्रेस, राष्ट्रवादी व टीडीएफ यांच्या संयुक्त शिक्षक मेळाव्यात आमदार थोरात बोलत होते. अध्यक्षस्थानी नाशिक पदवीधर मतदार संघाचे आमदार डॉ. सुधीर तांबे होते. व्यासपीठावर उमेदवार संदीप बेडसे, टीडीएफचे हिरालाल पगडाल, शिवाजी थोरात, चंद्रकांत कडलग, आर.बी. राहाणे, लक्ष्मण कुटे, भाऊसाहेब कुटे, सतिष कानवडे, राष्ट्रवादीचे कपील पवार, प्रशांत वामन, दिलीप शिंदे, केशव मुर्तडक, संपत डोंगरे, शंकर खेमनर, दत्तात्रय जोंधळे, रजिस्ट्रार बाबुराव गवांदे यांसह मान्यवर उपस्थित होते.
आमदार थोरात म्हणाले, भाजप सरकारचा प्रशासनावर अंकुश नसल्याने सगळीकडेच गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. भाजपा सरकाराला अजूनही जनतेचे प्रश्न कळले नाही. त्यामुळेच शेतकरी, व्यापारी, सामान्य नागरिक त्रस्त आहे. सरकार दुधाला प्रतिलिटर २७ रूपये भाव जाहिर करते. मात्र, प्रत्यक्षात १६ रूपये देते. शिक्षण क्षेत्रातही असंतोषाचे वातावरण आहे.
संदीप बेडसे हे कामाचे व सकारात्मक वृत्ती असलेले पुरोगामी विचार जोपासणारे आहेत. संगमनेर तालुका हा पुरोगामी विचारांच्या पाठीशी भक्कमपणे उभा असून संदीप बेडसे हे नक्कीच विजयी होऊन शिक्षकांचे प्रश्न सोडविण्यात अग्रेसर असतील असा विश्वासही आमदार थोरात यांनी व्यक्त केला.
आमदार डॉ. तांबे म्हणाले, केंद्र व राज्य सरकार हे शिक्षण क्षेत्र उद्धवस्त करु पाहत आहे. सहकार व शिक्षण ही बहुजनांची बलस्थाने आहेत. शिक्षण क्षेत्रात वाईट प्रवृत्ती वाढू नयेत यासाठी सर्वांनी काम करणे गरजेचे आहे. शिक्षक हा फक्त वगार्पुरता मर्यादित नसून तो समाजसुधारक आहे. म्हणून या क्षेत्रातील तत्परता, विनम्रता राखण्यासाठी सर्वांनी टीडीएफच्या उमेदवारांना पाठींबा द्यावा असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी प्राचार्य डॉ. आर. के. दातीर, प्रा. व्ही. बी. धुमाळ, डॉ. एम. ए व्यंकटेश, बी. के. शिंदे, बाबा लोंढे, एस. टी. देशमुख, सुभाष सांगळे, भारत वर्पे, दत्तु खुळे, मिलींद औटी, अॅड. सुहास आहेर, अॅड. अनिल गोडसे आदि उपस्थित होते. प्रास्ताविक सचिन फटांगरे यांनी केले. सुत्रसंचालन नामदेव कहांडळ यांनी केले. जिजाबा हासे यांनी आभार मानले.