नगर उड्डानपुलाच्या कामाचा भाजपने खेळ चालवलाय - सत्यजीत तांबे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2017 01:29 PM2017-10-14T13:29:02+5:302017-10-14T14:02:01+5:30
नगरकरांसाठी बहुप्रतिक्षेत असलेल्या उड्डाणपुलाच्या कामाचे भूमिपूजन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आज १४ आॅक्टोबर रोजी होणार असल्याचे भाजपाचे खासदार दिलीप गांधी यांनी जाहीर केले होते.
अहमदनगर : नगरकरांसाठी बहुप्रतिक्षेत असलेल्या उड्डाणपुलाच्या कामाचे भूमिपूजन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आज १४ आॅक्टोबर रोजी होणार असल्याचे भाजपाचे खासदार दिलीप गांधी यांनी जाहीर केले होते. मात्र या उड्डाणपुलाच्या कामाचे उद्घाटन करण्याचा विसर भाजपला पडला असून, त्यांची फक्त श्रेय घेण्यासाठी खटाटोप सुरु आहे़ नगरकरांसाठी अस्मिता ठरलेल्या उड्डाणपुलाच्या कामाचा सध्याच्या सरकारने खेळ चालविला असल्याचा आरोप महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष सत्यजीत तांबे यांनी केला आहे.
तांबे यांनी याबाबत शनिवारी पत्रकार परिषद घेतली़ तांबे म्हणाले, नगरच्या विकासासाठी हा उड्डाणपूल मैलाचा दगड ठरणार आहे. यासाठी आपण सातत्याने पाठपुरावा केला आहे. प्रसिद्धीपेक्षा काम होणे आपल्या दृष्टीने महत्वाचे आहे. यासाठी पत्रव्यवहार करुन पाठपुरावा केला़ अनेकांच्या भेटीगाठी केल्या आहेत. मात्र भाजपाचे विद्यमान खासदार दिलीप गांधी यांनी आज १४ आॅक्टोबर रोजी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भूमिपूजन होणार असल्याचे जाहिर केले होते. मात्र, आज उड्डाणपुलाच्या कामाचे उद्घाटन करण्यात आलेले नाही. भूमिपूजनही झालेले नाही़ त्यामुळे वस्तुस्थिती जाणून घेण्याअगोदरच उद्घाटनाची हवा करणे म्हणजे भाजपाचा पोरकटपणा आहे, अशी टीका तांबे यांनी केली़
उड्डाणपुलाच्या कामाची प्रक्रिया पहिल्या टप्प्यात आहे. यासाठी डीटीआर रिपोर्ट नाही. निविदा प्रक्रिया पूर्ण झालेली नाही. या कामाची कोणतीही वर्कआॅर्डर नाही. खरे तर शासनाच्या नव्या नियमानुसार काम पूर्ण झाले असल्याचा दाखला असल्याशिवाय उद्घाटन ही करता येत नाही, असेही सांगत तांबे म्हणाले.