सध्या सुडनाट्य अन् गुंडाराज सुरू; सुधीर मुनगंटीवारांची राज्य सरकारवर टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2022 11:32 PM2022-04-24T23:32:26+5:302022-04-24T23:33:38+5:30
भाजपाचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी महाविकास आघाडीवर टीका केली आहे.
राज्यात सध्या सुडनाट्य आणि गुंडाराज सुरू आहे. संविधानाचा सन्मान टिकवण्याऐवजी संविधान आणि लोकशाहीला गालबोट लागेल अशी कृती होत आहे. मात्र, जो वाईट कृती करतो त्याला संविधानाच्या शक्तीच्या आधारावर सर्व भोगावं लागत आहे, अशी टीका भाजपाचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे.
वंदे मातरम, भारत माता तसेच पंतप्रधानांसंदर्भात अपशब्द वापरणे हा राजद्रोह नाही. मात्र, हनुमान चालिसाचे पठण करणे हा राजद्रोह ठरत आहे. परिवारात पात्रता नसताना मोठ्या पदावर जाता येतं.ज्यांना वाईट कृती करायची त्यांनी करावी. न्यायपालिकेवर आम्हाला विश्वास असून अपिलात राणा दाम्पत्याचा विजय नक्की होईल, असं सुधीर मुंनगंटीवार यांनी म्हटलं आहे.
महाराष्ट्रातील राष्ट्रपती राजवटीबाबतही सुधीर मुनगंटीवार यांनी भाष्य केलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सांगितले आहे की, कधीही बँक डोअर एंट्री करू नका. नरेंद्र मोदी देखील राज्यसभेतून येऊ शकले असते. मात्र, ते जनतेतून निवडून आले. बँक डोअर एंट्री करणाऱ्यांना फक्त षडयंत्री राजकारण समजतं, असं मुनगंटीवार म्हणाले.
जनतेतून निवडून न आल्याने जनतेच्या समस्या आणि त्यांचे प्रश्न काय ? लोकहीत काय यापेक्षा फक्त स्वार्थाचा बाजार कसा करायचा हे त्यांना समजतं. भारतीय जनता पार्टी राष्ट्रपती राजवट लावेल असं त्यांना वाटत असेल. मात्रं भाजप दुसऱ्या मार्गाने राष्ट्रपती राजवट लावणार नाही, असं स्पष्टीकरण सुधीर मुनगंटीवार यांनी दिलं आहे.
दरोडे पडताय, शेतकऱ्यांचे प्रश्न सुटलेले नाही- केंद्रीय मंत्री नारायण राणे
पोलीस आणि शिवसैनिक एकत्र येऊन सूड उगवण्याचे काम करत आहेत. कायदा आणि सुव्यवस्था नाही. खून होत आहेत. दरोडे पडताय, शेतकऱ्यांचे प्रश्न सुटलेले नाही, अशा परिस्थितीत राष्ट्रपती राजवट येणे गरजेचं आहे, असं मत नारायण राणे यांनी व्यक्त केलं आहे. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सक्षम नाही. राज्याचे प्रश्न त्यांना माहिती नाही. ८९ हजार कोटींचा तूट आहे. राज्याची व्यवस्था पूर्णपणे बिघडली असल्याची टीकाही नारायण राणे यांनी केली आहे.
राष्ट्रपती राजवट लावल्यास राज्यातील जनता पेटून उठेल- मंत्री जयंत पाटील
राष्ट्रपती राजवटीच्या मागणीवरून मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी विरोधकांवर पलटवार केला आहे. राष्ट्रपती राजवट लावली तर राज्यातील जनता पेटून उठेल, असा इशारा जयंत पाटील यांनी दिला आहे. विरोधकांचे आता सर्व उपाय संपले आहेत. त्यामुळे आता राष्ट्रपती राजवट लावण्याचा प्रयत्न दिसत आहे, असंही जयंत पाटील यांनी सांगितलं. त्यांनी आज औरंगाबादमध्ये माध्यमांशी संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते.