अहमदनगरची बाजारपेठ उद्धवस्त करण्याचा भाजप-राष्ट्रवादीचा डाव! काँग्रेसची टीका

By साहेबराव नरसाळे | Published: April 18, 2023 02:01 PM2023-04-18T14:01:08+5:302023-04-18T14:01:20+5:30

कापड बाजारातील एका व्यापाऱ्यावर काही दिवसांपूर्वी हल्ला

BJP-Nationalist plot to destroy Ahmednagar market! Criticism of Congress | अहमदनगरची बाजारपेठ उद्धवस्त करण्याचा भाजप-राष्ट्रवादीचा डाव! काँग्रेसची टीका

अहमदनगरची बाजारपेठ उद्धवस्त करण्याचा भाजप-राष्ट्रवादीचा डाव! काँग्रेसची टीका

साहेबराव नरसाळे, लोकमत न्यूज नेटवर्क, अहमदनगर: व्यापाऱ्यांच्या आडून राजकीय नेते पोळ्या भाजत आहेत. भाजप-राष्ट्रवादीमुळे शहरातील वातावरणात तणाव निर्माण होत आहे. या दोन्ही पक्षाच्या नेत्यांकडून राजकीय व आर्थिक स्वार्थासाठी बाजारपेठ उध्वस्त करण्याचे षडयंत्र सुरू आहे. त्यांना ना व्यापाऱ्यांची काळजी आहे, ना हॉकर्सची, अशी टीका काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी पत्रकार परिषदेत केला.

कापड बाजारातील एका व्यापाऱ्यावर काही दिवसांपूर्वी हल्ला झाला होता. त्यापार्श्वभूमीवर नगरमधील वातावरण तणावग्रस्त बनले आहे. मात्र, त्यास भाजप व राष्ट्रवादीचे नेते जबाबदार आहेत, अशी टीका काँग्रेसकडून केली आहे. काळे यांनी पत्रकार परिषद घेऊन राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांच्यासह भाजप नेत्यांवर गंभीर आरोप केले. यावेळी मनोज गुंदेचा, मनसुख संचेती, रतिलाल भंडारी, दशरथ शिंदे, प्रवीण गीते, सुजित क्षेत्रे, राहुल सावंत, गौरव घोरपडे आदी उपस्थित होते.

काळे म्हणाले, नवलानी यांच्यावरील हल्लेखोराला कठोर शिक्षा झाली पाहिजे. फरार आरोपींना तात्काळ अटक झाली पाहिजे, अशी आमची मागणी आहे. पोलिसांचा धाक उरलेला नाही. वर्षभरापूर्वी अतिक्रमण विरोधी कारवाई करुन तात्पुरती मलमपट्टी करत व्यापाऱ्यांची फसवणूक करण्यात आली होती. त्यांनी मोठी गुंतवणूक करून दुकानं घेतली आहेत. त्यांच्यावर अन्याय होणार नाही याची जबाबदारी मनपावर आहे. मात्र गोरगरीब, हातावर पोट भरणाऱ्यांचे फेरीवाला धोरणाप्रमाणे जोपर्यंत कायमस्वरूपी योग्य पुनर्वसन मनपा करत नाही, तोपर्यंत व्यापाऱ्यांची मागणी कायमस्वरूपी निकाली निघू शकत नाही. बाजारपेठेत स्वतःच एकही दुकान नसणारे तथाकथित राजकीय पुढारी ढोंगी भाषणबाजी करून एकाच वेळी व्यापारी, हॉकर्सची फसवणूक करत आपली राजकीय दुकानदारी चालवीत असल्याचा आरोप काळेंनी केला.


आडते बाजार, डाळमंडई स्थलांतराचा डाव

शहरात बाजार समितीची २८ एकर जागा आहे. सोयऱ्या धायऱ्यांच्या हातात सत्ता आहे. लोकसभा, विधानसभा निवडणुकांनंतर ३ फेजमध्ये समिती आवारात पुर्नविकासाच्या नावाखाली २०० कोटी रूपयांचा बांधकाम आराखडा तयार करण्यात आला असून गाळ्यांच्या विक्रीतून मलिदा लाटण्यासाठी आटापिटा नेत्यांचा सुरू आहे. कोरोना काळात भाजी व फळबाजार नेप्ती उपबाजाराला स्थलांतरित करण्याचा डाव व्यापाऱ्यांच्या विरोधामुळे फसला. भविष्यात दहशतीच्या जोरावर तो स्थलांतरीत केला जाणार असून तिथे आडते बाजार, डाळमंडई स्थलांतरित करण्याचा डाव असल्याचा गौप्यस्पोट काळेंनी केला. त्यासाठीच बाजारपेठेतील वातावरण खराब केले जात असल्याचा दावा काळे यांनी केला.

व्यापारी, फेरीवाल्यांच्या प्रश्नाला धार्मिक रंग

मर्जीतल्या बिल्डरांना हाताशी धरून पाईपलाईन रोड, झोपडी कॅन्टीनजवळ व्यावसायिक गाळे, मॉलचे काम सुरू आहे. मनमाड रोडवर एका संस्थेचा मोठा भूखंड लाटून ३०० कोटींचा मॉल उभा करण्याचा डाव या नेत्यांचा आहे. बाजारपेठ उध्वस्त केल्याशिवाय पुढारी, बिल्डर लॉबीच्या संगनमतातून उभे राहणारे हे मॉल चालणार नाहीत. ग्राहक मिळणार नाही. यामुळेच बाजारपेठेतील विषयाला धार्मिक रंग देण्याचे षडयंत्र आहे. मॉल संस्कृतीमुळे बाजारपेठ, उपनगरांतील छोटे व्यापारी कायमचे उध्वस्त होतील, अशी भीती काळे यांनी व्यक्त केली.

हिंमत असेल तर राणेंनी आरोपींना अटक करुन दाखवावी

भाजप नेते आ. नितेश राणे नगरमध्ये येत आहेत. यावर टिप्पणी करताना किरण काळे म्हणाले, राणे हिंदूंसाठी येत असल्याचे सांगितले जात आहे. त्यांनी येताना शहरातील ५० हजार हिंदू तरुण बांधवांच्या रोजगारासाठी सरकारकडून एमआयडीसी करिता १० हजार कोटींचे पॅकेज आणावे. टाटा, बिर्ला, महिंद्रा, बजाज या सारखे मोठे उद्योग घेऊन यावेत. यामुळे बाजारपेठेतील व्यापाराला देखील चालना मिळेल. नवलानींसह हिंदू बांधव असणारे माळी समाजाचे कांदा व्यापारी चिपाडे यांनाही राणेंनी न्याय मिळवून द्यावा. राणेंनी हिंमत असेल तर बाजारपेठेत जाण्यापूर्वी चिपाडे यांच्यावरील हल्लेखोरांना त्यांच्या सरकारच्या माध्यमातून अटक करुन दाखवावी, असे आव्हान काँग्रेसने दिले.

Web Title: BJP-Nationalist plot to destroy Ahmednagar market! Criticism of Congress

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.