बंगालमधील हिंसाचाराविरुद्ध श्रीरामपुरात भाजपची निदर्शने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2021 04:21 AM2021-05-06T04:21:24+5:302021-05-06T04:21:24+5:30
श्रीरामपूर : पश्चिम बंगालमधील हिंसाचाराच्या निषेधार्थ शहर भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी उत्तर नगर जिल्हाध्यक्ष राजेंद्र गोंदकर यांच्या नेतृत्वाखाली बुधवारी निदर्शने ...
श्रीरामपूर : पश्चिम बंगालमधील हिंसाचाराच्या निषेधार्थ शहर भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी उत्तर नगर जिल्हाध्यक्ष राजेंद्र गोंदकर यांच्या नेतृत्वाखाली बुधवारी निदर्शने केली. नायब तहसीलदार ज्योती गुंजाळ यांना यावेळी निवेदन देण्यात आले.
भाजप पदाधिकाऱ्यांनी काळ्या फिती लावून बंगालमधील हिंसाचाराचा निषेध नोंदवला. यावेळी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष सतीश सौदागर, जिल्हा उपाध्यक्ष गणेश राठी, शहराध्यक्ष मारुती बिंगले, शहर संयोजक विशाल अंभोरे, विश्वनाथ गवळी, रवी पंडित, आदी उपस्थित होते. बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर सत्ताधारी तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी राज्यभर जबरदस्त हिंसाचार सुरू केल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. तेथील भाजप कार्यकर्त्यांचे खून केले जात आहेत. दुकाने, व्यवसायांची तोडफोड सुरू आहे.
या राजकीय हिंसाचाराचा निषेध करण्यासाठी व संबंधित तृणमूल काँग्रेसच्या गुंड प्रवृत्तीच्या कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल करावा, या मागणीसाठी हे देशव्यापी आंदोलन करण्यात आले. यावेळी कोरोना सुरक्षेचे सर्व नियम पाळण्यात आले, असे आंदोलनकर्त्यांनी सांगितले.