कर्जतमध्ये भाजपला धक्का; दोन नगरसेवकांचा राष्ट्रवादीत प्रवेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 30, 2020 12:56 PM2020-09-30T12:56:46+5:302020-09-30T12:57:02+5:30
कर्जत नगरपंचायतीच्या भाजपच्या दोन नगरसेवकांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. नगरसेवकांच्या प्रवेशामुळे भाजपचे माजीमंत्री प्रा.राम शिंदे यांच्या गटाला मोठा धक्का बसला आहे.
कर्जत : कर्जत नगरपंचायतीच्या भाजपच्या दोन नगरसेवकांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. नगरसेवकांच्या प्रवेशामुळे भाजपचे माजीमंत्री प्रा.राम शिंदे यांच्या गटाला मोठा धक्का बसला आहे.
कर्जत तालुका भारतीय जनता पक्षात पडलेले गट व यामुळे होणारी कोंडी, भाजप नेतृत्वाची काम करण्याची मानसिकता याला वैतागून कर्जत नगरपंचायतीचे विद्यमान नगरसेवक बापूसाहेब नेटके व नगरसेविका मनिषा सोनमाळी यांनी भाजपला सोडचिठ्ठी देऊन राष्ट्रवादीचे घड्याळ हाती बांधले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष काकासाहेब तापकीर व राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष नितीन धांडे यांच्या उपस्थितीत आमदार रोहित पवार यांच्या कर्जत येथील निवासस्थानी बुधवारी हा पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम पार पडला.
या दोन नगरसेवकांबरोबरच भाजपचे तालुका उपाध्यक्ष सतिष पाटील, भाजपचे युवा नेते सचिन सोनमाळी, सामाजिक कार्यकर्ते डॉ. प्रकाश भंडारी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष सुनील शेलार, उद्योजक दादासाहेब थोरात, भास्कर भैलुमे, रवि पाटील आदी उपस्थित होते. १० आॅक्टोबर रोजी कर्जत तालुक्यातील अनेक बड्या नेत्यांचाही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश होणार आहे, अशी माहिती नगरसेवक बापूसाहेब नेटके यांनी दिली.
कर्जत नगरपंचायतीच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर झालेले हे सत्तांतर म्हणजे सत्ता परिवर्तनाची सुरुवात आहे, असे मत राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष नितीन धांडे यांनी व्यक्त केले.