Radhakrishna Vikhe Patil: “अनिल देशमुख आणि नवाब मलिकांना राष्ट्रवादीचा वेगळा न्याय का”; भाजपचा रोकडा सवाल
By ऑनलाइन लोकमत | Published: February 25, 2022 06:54 PM2022-02-25T18:54:10+5:302022-02-25T18:55:18+5:30
Radhakrishna Vikhe Patil: नवाब मलिकांची सरकारमधून हकालपट्टी करुन त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला पाहिजे, असे भाजपने म्हटले आहे.
लोणी: राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांना सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) अटक केल्यानंतर ३ मार्चपर्यंत त्यांना ईडी कोठडी सुनावण्यात आली आहे. यानंतर महाविकास आघाडीने (Maha Vikas Aghadi) आक्रमक पवित्रा घेतला आहे. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी राज्यभर आंदोलने, निदर्शने केल्याचे पाहायला मिळाले. आताच्या घडीला शांततेत झालेले आंदोलन आगामी काळात आक्रमक रुप घेऊ शकते, असे संकेतही दिले जात आहेत. अशातच आता अनिल देशमुख आणि नवाब मलिकांना राष्ट्रवादी काँग्रेसकडून वेगळा न्याय का, अशी विचारणा भाजपकडून करण्यात आली आहे.
भाजप नेते राधाकृष्ण विखे-पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना नवाब मलिक यांच्यावर झालेली ईडी कारवाई, संजय राऊतांची आरोपबाजी यांसारख्या विविध मुद्द्यांवर रोखठोक प्रतिक्रिया व्यक्त केली. यावेळी बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसकडून अनिल देशमुख यांना एक न्याय आणि नवाब मलिक यांना वेगळा न्याय का, असा थेट सवाल राधाकृष्ण विखे-पाटील यांनी केला.
देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला पाहिजे
नवाब मलिक यांचे एवढ्या गंभीर प्रकारणात नाव आल्यावर बडतर्फ नव्हे तर हकालपट्टी केली पाहिजे होती. त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला पाहिजे. अनिल देशमुखांवर लगेच कारवाई केली जाते आणि यांना पाठिशी घालण्याचे कारण काय, सरकार मध्ये जनाची नाही पण मनाची लाज असेल तर त्यांनी कारवाई केली पाहिजे, अशी टीका राधाकृष्ण विखे-पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि महाविकास आघाडीच्या ठाकरे सरकारवर केली आहे.
कोरोना काळात शिक्षण विभागाचे प्रचंड नुकसान
बारावीच्या प्रश्नपत्रिका घेऊन जाणारा टेम्पो जळाला की, जाळला चौकशी करायला हवी. सरकार आधीच भरती प्रक्रियेत अडचणीत आले आहे. एकही भरती प्रक्रिया पारदर्शीपणे पार पडत नाही. कोरोना काळात शिक्षण विभागाचे प्रचंड नुकसान झाले आहे. त्यातच प्रश्नपत्रिका असलेल्या टेम्पोला आग लागलीय. सदर जळीत प्रकरणाचा तपास करण्यासाठी उच्चस्तरीय समिती नेमावी, अशी मागणीही विखे-पाटील यांनी केली आहे.
दरम्यान, संजय राऊतांकडून भाजपवर होत असलेल्या टीकेचा समाचार घेताना, आधार नसलेली बेताल वक्तव्य करण्याचे काम संजय राऊत करत आहेत. सततच्या चौकशीमुळे संजय राऊत अडचणीत आले आहेत. उद्या आपल्यावर कारवाई होईल या भीतीने संजय राऊत हे बेताल वक्तव्य करत आहेत, असा पलटवार राधाकृष्ण विखे-पाटील यांनी केला.