नगर विधानसभेची जागा भाजपलाच घेणार-दिलीप गांधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2019 13:45 IST2019-09-10T13:44:23+5:302019-09-10T13:45:13+5:30
नगरची जागा भाजपच लढविणार असून याबाबत मुख्यमंत्र्यांनाही साकडे घालणार आहे, असे गांधी यांनी सांगितले. गेल्या २५ वर्षांचा काळा इतिहास बदलण्यासाठी बदल हवा आहे, असे माजी खासदार दिलीप गांधी म्हणाले.

नगर विधानसभेची जागा भाजपलाच घेणार-दिलीप गांधी
अहमदनगर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नगरच्या विकासाला ३०० कोटी देण्याचे अभिवचन दिले आहे. त्यामुळे नगर शहरात मुख्यमंत्र्यांचे शाही स्वागत करण्याचे नियोजन माजी खासदार दिलीप गांधी यांनी केले आहे. नगरची जागा भाजपच लढविणार असून याबाबत मुख्यमंत्र्यांनाही साकडे घालणार आहे, असे गांधी यांनी सांगितले. गेल्या २५ वर्षांचा काळा इतिहास बदलण्यासाठी बदल हवा आहे, असेही गांधी म्हणाले.
मुख्यमंत्र्यांची महाजनादेश यात्रा शुक्रवारी जिल्ह्यात येत आहे. शुक्रवारी (दि. १३) सायंकाळी पाच वाजता शहरातून रोड शोचे आयोजन करण्यात आले आहे. याची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत गांधी चांगलेच आक्रमक झाले होते. भाजपकडून सात ते आठजण निवडणूक लढविण्यास इच्छुक आहेत. कोणाला उमेदवारी द्यायची त्याचा फैसला वरिष्ठ घेतील,मात्र आधी ही जागा भाजपलाच घेण्यासाठी आम्ही मुख्यमंत्र्यांना साकडे घालणार आहेत. जागा तर भाजपलाच मिळणार आहे, यात शंका नाही. मात्र युती म्हणून अनिल राठोड यांना उमेदवारी देणार असाल तर त्याला पहिला आमचा विरोध राहील. राठोड यांना गांधी चालत नसेल तर गांधी यांनाही राठोड अजिबात चालणार नाही. गेल्या २५ वर्षांत कोणताही विकास कामे झाली नाहीत. शहरात उद्योग आले नाहीत. रोजगार मिळाला नाही. त्यामुळे शहरात आता बदल हवा आहे. बदल घडविण्यासाठी नगर विधानसभाचे जागा भाजपलाच मिळणे गरजेचे आहे. असेही गांधी यांनी सांगितले.
दरम्यान महाजनादेश यात्रेचे शाही स्वागत करण्यात येणार आहे. हत्ती, घोडे, तुतारी, सनई, चौघडा, कमानी, पुष्पवृष्टी अशा प्रकारे मुख्यमंत्र्यांचे स्वागत करण्यात येणार असून त्यादृष्टीने जोरदार तयारी करण्यात येत आहे.