आघाडी सरकारवर भाजपाचे टीकास्त्र
By Admin | Published: September 18, 2014 11:14 PM2014-09-18T23:14:28+5:302024-10-04T20:48:28+5:30
चौंडी /जामखेड : संघर्ष यात्रेचा समारोप आणि भाजपा प्रचाराचा बिगूल फुंकताना गुरुवारी भाजपा नेत्यांनी राज्यातील आघाडी सरकारवर जोरदार हल्ला चढविला.
चौंडी /जामखेड : संघर्ष यात्रेचा समारोप आणि भाजपा प्रचाराचा बिगूल फुंकताना गुरुवारी भाजपा नेत्यांनी राज्यातील आघाडी सरकारवर जोरदार हल्ला चढविला. त्यासोबतच राज्यात भाजपाची सत्ता आणा, असे आवाहन केले.
दोन दिवसांपासून जिल्ह्यात आलेल्या आ.पंकजा मुंडे-पालवे यांच्या संघर्ष यात्रेच्या समारोपाकडे राज्याचे लक्ष लागून होते. या समारंभावर पूर्णत: पंकजा मुंडे यांचे वर्चस्व दिसले. अमित शहा यांनी त्यांचे कौतुक करतानाच ‘राज्यात जा. मोदी-मुंडेचा संदेश जनतेला द्या. परिवर्तन घडवा’ असा मंत्र देताना त्यांचे महत्व अधोरेखित केले. तत्पूर्वी ‘राज्यातील गरीब जनतेच्या पायाशी सत्ता आणण्यासाठी संघर्ष यात्रा काढली’, असे स्पष्ट करत आ.पंकजा मुंडे-पालवे म्हणाल्या ‘सामान्य जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी रस्त्यावर आले आहे. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील सत्ता राज्यात आणायची आहे. त्यासाठी स्व.गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर अश्रू बाजूला ठेवून उभी झाली आहे. राज्यात महिलांवर होणाऱ्या अन्यायाचा त्यांनी उल्लेख केला. तसेच तरुणांच्या हाताला काम देण्यासह त्यांचा ऊर्जावान बनविण्याचा संकल्पही जाहीर केला.
दरम्यान, अमित शहा यांनी आगमनानंतर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मृतिस्तंभाला अभिवादन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आ.राम शिंदे यांनी केले.
(तालुका प्रतिनिधी)
..आली रे आली, आता अजित पवारांची बारी आली!
विनोद तावडे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पुन्हा एकदा लक्ष्य केले. त्यांच्या टीकेला उत्तर देताना ते म्हणाले, ‘अजित पवार म्हणतात, आता माझी सटकली. मला १०० दिवस द्या टोल बंद करुन दाखवतो. जनतेने तुम्हाला ५ हजारांवर दिवस दिले, एवढे दिवस काय केले? ‘अजित पवार, आली रे आली आता तुझी बारी आली’ असे त्यांनी उच्चारताच एकच हास्यकल्लोळ झाला. दिवसा सत्तेचे स्वप्न पडतात, या टीकेचेही त्यांनी उत्तर दिले. ‘स्व.मुंडे यांनी पहिल्यांदा १९९४ मध्ये संघर्ष यात्रा काढली, तेव्हाही शरद पवारांनी त्यांना असेच डिवचले होते. त्यावर मुंडेजी म्हणाले होते ‘स्वप्न तर मर्दांना पडतात.’ आजही संघर्ष यात्रा निघाली आहे. भाजपाची सत्ता येणार आहे, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
चक्की पिसींग अॅण्ड पिसींग!
प्रदेशाध्यक्ष फडणवीस यांनी राज्य सरकारवर दरोडेखोर असल्याचा आरोप केला. ते म्हणाले, सामाजिक न्यायाची भूमिका आम्हाला स्व.मुंडे यांनी शिकविली. तुम्ही (आघाडी) आम्हाला शिकवू नका. आघाडीच्या सरकारने या राज्यावर दरोडा घातला. कोट्यवधी लुटले. पण भाजपाचे सरकार येताच आघाडीच्या नेत्यांनी परदेशात दडवलेली पै न् पै आणल्याशिवाय राहणार नाही. अजित पवारांना सिंचन घोटाळ्यात जेलमध्ये टाकणार आहे. तेव्हा ‘अजितदादा चक्की पिसींग...पिसींग अॅण्ड पिसींग’ असा टोला त्यांनी मारला. गृहमंत्री आर.आर.पाटील यांच्यावर टीका करताना ‘राज्यात बलात्कारांची संख्या वाढली आहे. तेव्हा आर.आर.पाटील यांनी पोपटपंची बंद करावी आणि राज्याची अवस्था आधी बघावी. पण त्यासाठी धमक लागते आणि स्व.मुंडे यांच्यासारखा गृहमंत्री लागतो.’
पंकजा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा!
राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर यांना बोलण्याची संधी मिळताच त्यांनी ‘पंकजा यांना पुढे करा, तोच मुख्यमंत्रिपदाचा चेहरा म्हणून पुढे करा. राज्यात सत्ता निश्चित येईल’, अशी जाहीर विनंतीवजा सूचना अमित शहा यांना करुन टाकली. ‘बहुजन समाजाला न्याय मिळेल’ अशी पुस्तीही त्यांनी जोडून टाकली. जानकर यांच्या मागणीला जोरदार टाळ्या वाजवून उपस्थितांनी समर्थन दिले.